काँग्रेसचा लखलखता तारा निखळला! जाणून घ्या रोहिदास पाटील यांचा जीवनप्रवास

Rohidas Patil : शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान
Rohidas Patil
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे आज (दि.२७) सकाळी ११ च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.(File Photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे आज (दि.२७) सकाळी ११ च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. (Rohidas Patil Passes Away) त्यांची अंत्ययात्रा शनिवारी (दि. २८) सकाळी ११ वाजता नेहरू हौसिंग सोसायटी, देवपूर, धुळे येथील निवासस्थानापासून निघेल आणि एसएसव्हीपीएस कॉलेज ग्राउंडवर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचे अंत्यदर्शन शनिवारी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत नेहरू हौसिंग सोसायटी, देवपूर, धुळे येथील सुंदर सावित्री सभागृहात घेता येईल.

यूवा चळवळीमध्ये सक्रिय सहभाग

रोहिदास चुडामण पाटील (रवंदळे) यांचा जन्म १३ जून १९४० रोजी स्वातंत्र्य सैनिक चुडामण आनंदा पाटील आणि सुंदराबाई (बायजाबाई) यांच्या पोटी झाला. त्यांनी आपले शिक्षण बी.ई. - मॅकेनिकलमधून पूर्ण केले. त्यांचा विवाह लता यांच्याशी झाला. त्यांना एक मुलगी आणि दोन मुले अशी ३ अपत्ये आहेत. बी. ई. मॅकेनिकल असलेल्या रोहिदास यांनी आपल्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कारकिर्दीत अनेक पदांचा कार्यभार सांभाळला. 

रोहिदास यांचा यूवा चळवळीमध्ये सक्रिय सहभाग होता. त्यांनी विद्यापीठ आणि अंतरविद्यापीठ स्तरावर युवा नेतृत्व केले आहे. जी.एस.टी.आय. इंदौर महाविद्यालात ते सांस्कृतिक सचिव होते. काँग्रेस सेवा दलाचे ते सदस्य होते. त्यानंतर ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी झाले. धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष झाले. रोहिदास हे  कै. भाऊसाहेब हिरे स्मृती मंगल कार्यालय आणि सभागृह आणि जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्ट धुळेचे संस्थापक होते.

Rohidas Patil  : रोहिदास पाटील यांचा राजकीय प्रवास...

रोहिदास यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक पदे भुषवली. त्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात सांस्कृतिक नेतृत्व केले. ते 1972 ते 1978 या काळात जिल्हा परिषद धुळेचे सदस्य झाले. महाराष्ट्र राज्य विधानसभेत प्रथम 1980-1985 या काळात आमदार राहिले. तर 1986-1990 या काळात महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सदस्य राहिले. त्यानंतर सलग चारवेळा (1990-1995, 1995-1999, 1999-2004, 2004-2009) महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सदस्य राहिले. (Rohidas Patil )

रोहिदास पाटील यांनी 1986 ते  2004 या काळात महसूल राज्यमंत्री (12 मार्च 1986 ते जून 1988), कृषी व फलोत्पादन आणि रोजगार  मंत्री (जून 1991 ते नोव्हेबर 1992), कामगार, रोजगार, फलोत्पादन आणि ग्रामीण विकास मंत्री (नोव्हेबर 1992 ते मार्च 1993) पाटबंधारे मंत्री, (सप्टेंबर 1994 ते मार्च 1995),  महाराष्ट्र विधानसभा काँग्रेस पक्ष प्रतोद (एप्रिल 1995 ते ऑक्टोबर 1999), गृहनिर्माण, पुर्नबांधणी व संसदीय कामकाज मंत्री (6 नोव्हेबर 1999 ते 9 मार्च 2001) कृषी आणि पशुसंवर्धन मंत्री (9 मार्च 2001 ते 6 मार्च 2002) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, प्रवक्ता (19 फेब्रुवारी 2003 ते 28 जून 2004) या पदांचा कार्यभार सांभाळला. यानंतर त्यांनी 2003 पासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मुंबई, उपाध्यक्ष पदभार सांभाळला. त्यांनी आपल्या कार्यकाळात अक्कलपाडा प्रकल्प (पांझरा नदी), गिरणा नदी डावा कालावा आणि जवाहर वॉटर शेड असे महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण केले. 

Rohidas Patil Passed Away : शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान 

रोहिदास हे अनेक शैक्षणिक संस्थाचे संस्थापक राहिले आहेत. या शैक्षणिक संस्थांचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. विविध ठिकाणी शाळा आहेत. रोहिदास हे श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था धुळेचे संस्थापक चेअरमन राहिले आहेत. या संस्थेची धुळे जिल्ह्यात अभियांत्रिकी माहाविद्यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय असून एकूण ४० माध्यमिक हायस्कूल आहेत.

श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या (धुळे) दोन पुर्व प्राथमिक शाळा आहेत. आठ हायस्कूल, सात उच्च माध्यमिक हायस्कूल, एक चित्रकला महाविद्यालय, एक अध्यापक विद्यालय, एक अभियांत्रिकी महाविद्यालय, एक मुलांचे वसतीगृह, तंत्रनिकेतन महाविद्यालय, एक मुलींचे वसतीगृह, एक बालसदन आहे. जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेची (धुळे)  एक पूर्व प्राथमिक शाळा, नऊ हायस्कूल, दोन प्राथमिक शाळा, एक अध्यापक विद्यालय, एक उच्च माध्यमिक, चार निवासी शाळा, दोन बी.एड महाविद्यालय, एक प्राथमिक आणि एक माध्यमिक आहे. 

जवाहर एज्युकेशन सोसायटीची (मुंबई) एक सीबीएसई प्राथमिक शाळा, दोन अभियांत्रिकी महाविद्यालय, एक सीबीएसई सेंकडरी शाळा, एक तंत्रनिकेतन महाविद्यालय, एक हायर सेकंडरी, एक मॅनेजमेंट महाविद्यालय आहे.

गरजुंना आरोग्य सेवा 

रोहिदास हे जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टचे (धुळे) संस्थापक चेअरमन होते. या संस्थेची स्थापना सामाजिक क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून अपंगांना 1000 तीन चाकी सायकलीचे वाटप करण्यात आले असून उत्तर महाराष्ट्रातील 1000 पेक्षा जास्त ऐकू न येणाऱ्या लाभार्थ्यांना उपकरणांचे वाटप केले आहे. संस्थेमार्फत गोरगरिब व गरजू लाभार्थ्यांना मुंबई, पुणे नाशिक येथील अद्ययावत हॉस्पिटलमध्ये वैद्यकिय सुविधा मिळाव्यात सर्वोतोपरी सहकार्य व मदत केली जाते. विविध मैदानी खेळामध्ये युवकांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा याकरीता विविध स्पर्धाचे आयोजन केले जाते. 

रोहिदास यांच्या जवाहर मेडिकल फाऊंडेशनचे (धुळे) एक नर्सिंग कॉलेज,  एक डेन्टल कॉलेज, एक हॉस्पिटल, एक मेडीकल कॉलेज आहे. जवाहर मेडिकल फाऊंडेशन आणि कै. अण्णासाहेब चुडामण पाटील मेमोरियल मेडीकल कॉलेज, डेंटल कॉलेज आणि नर्सिंग कॉलेज मार्फत जिल्ह्यातील गोरगरीब, गरजू रुग्णांना वैद्यकिय सेवा पुरविण्यात येते. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील गरीब आदिवासी रुग्ण तसेच दिव्यांग बांधवांना वैद्यकीय सेवेसह आर्थिक सहकार्य केले जाते. तसेच गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी संस्थेमार्फत अर्थसहाय्य केले जाते.

सहकार क्षेत्रातील योगदान

रोहिदास पाटील यांनी जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना काम मिळावे तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळावा व त्यांची आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने सहकारी संस्थांची निर्मिती केली. त्यासंस्था पुढीलप्रमाणे,

  • जवाहर शेतकरी सहकारी सूत गिरणी लि. मोराणे

  • जवाहर शेतकरी सहकारी रोटो सूत गिरणी लि. गरताड

  • जवाहर महिला शेतकरी सहकारी सूत गिरणी अजंग

  • जवाहर कुक्कुटपालन सहकारी संस्था मोराणे

  • जवाहर सहकारी पशुखाद्य मोराणे

विविध क्षेत्रात मिळालेले पुरस्कार

  • महाराष्ट्र शासन - उत्कृष्ट संसदपट्टू पुरस्कार 1998-99

  • चेअरमन, धुळे जिल्हा खरेदी विक्री संघ

  • संचालक, धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, धुळे

  • संचालक, महाराष्ट्र राज्य मार्केटींग फेडरेशन

  • संचालक, इंडियन फार्मर्स फर्टीलायझर को. ऑप. संस्था दिल्ली

  • संचालक, महाराष्ट्र हौसिंग एरिया डेव्हपलमेंट अथॉरिटी ऑफ औरंगाबाद (म्हाडा) 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news