

पिंपळनेर : दोन समाजात तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजकुर लिहलेले पत्रक छापून नाशिकच्या पंचवटी परिसरात या पत्रांचे वाटप करण्यात आले. या घटनेनंतर नाशिकमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. या घटनेचे पडसाद नाशिकबाहेरही उमटले आहेत. या प्रकरणातील आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यामागणीसाठी साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे रास्तारोको करण्यात आला.
नाशिकच्या आक्षेपार्ह पत्रक वाटप घटनेचे पडसाद पिंपळनेरला उमटले.
दलित समाज बांधवांनी आज (दि. 24) सकाळी रास्तारोको केला.
संबधित आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली.
दलित समाज बांधवांनी आज (दि. 24) सकाळी 11 वाजता तब्बल एक तास बस थांब्यावर रास्तारोको करीत घटनेचा निषेध केला. यामुळे ट्राफिक जाम झाली होती.
नाशिक शहरातील काळाराम मंदिराजवळ एका समाजकंटकाने दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे पत्रक काढल्याने त्याचे पडसाद राज्यभर उमटले. आज पिंपळनेर शहरातील दलित समाजाबरोबरच सकल एससी, एसटी, ओबीसी समाजातर्फे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. एसटी बसस्थानकाजवळ पाऊण तास रोको आंदोलन करण्यात आला. यावेळी समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
प्रसंगी विविध मान्यवरांनी आपल्या भाषेतून घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी पोलीस ठाण्याचे श्री. चौरे यांना निवेदन देवून समाजकंटकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक ठप्प झाली होती. पोलीसांच्या मदतीने काही वेळानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.