

पिंपळनेर, जि.धुळे : साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील कांदा व्यापाऱ्याची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी साक्री न्यायालयात धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यावरून भावनगर, गुजरात येथील कांदा व्यापारी सुनील शांतारामदास पंजाबी याच्या विरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सुरेश वसंत पाटील (अहिरे) (रा.साईबाबा कॉलनी पिंपळनेर) हे शेतकरी व कांदा व्यापारी असल्याने त्यांनी खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती देशशिरवाडे येथून 9 जून 2023 ते 30 ऑक्टोबर 2023 दरम्यान वेळोवेळी संशयित कांदा व्यापारी सुनीलभाई शांतारामदास पंजाबी मे.देव ओनियन ट्रेंडिंग कंपनी व हर्ष टेंडर्स मार्केट यार्ड भावनगर गुजरात येथील व्यापाऱ्याला विकला होता. या दरम्यान या व्यापाऱ्याने 18 लाख 16 हजार 671 रुपये किमतीचा कांदा घेतलेला होता. या रकमेपैकी नमूद संशयित व्यापाऱ्याने सुरेश पाटील यास 15 लाख 99 हजार 671 रुपये परत केले आहेत, मात्र उर्वरित 2 लाख 17 हजार रुपये आरोपीकडे बाकी असल्याने सदर रक्कम व्यापाऱ्यांकडून मिळाल्यानंतर पिंपळनेर येथील कांदा व्यापारी सुरेश पाटील यांच्या बॅंक खात्यात टाकतो असे आश्वासन दिले होते.
त्याप्रमाणे संशयिताच्या शब्दांवर विश्वास ठेवून बरेच दिवस पैशांची मागणी केली नाही. त्यावरून सुरेश पाटील यांनी 27 जानेवारी 2024 रोजी संशियत व्यापाऱ्याला फोनवर संपर्क केला असता 8 दिवसांत पैसे परत करतो असे सांगून देखील आजपर्यंत कांदा व्यापारी सुरेश पाटील यांना पैसे परत केले नाही. हेतूपुरस्सर रक्कम बुडविण्याच्या व लबाडीच्या इराद्याने आर्थिक नुकसान करण्याच्या हेतूने ही रक्कम परत केलेली नाही. संशयित व्यापारी सुनीलभाई शांतारामदास पंजाबी यांच्या विरोधात सुरेश पाटील यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनी किरण बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ मालचे करीत आहेत.