

पिंपळनेर,जि.धुळे : शेती करत असताना तिला नियोजन आणि आधुनिकतेची जोड दिल्यास चमत्कार घडू शकतो,अशी उदाहरणे आजवर अनेकवेळा दिसून आली आहेत. असे एक उदाहरण सध्या साक्री तालुक्यातील सामोडे येथे देखील दिसून आले. येथील प्रयोगशील शेतकरी संजय आनंदा घरटे यांनी अडीच एकर क्षेत्रात 65 दिवसांत तब्बल 3 लाख 40 हजारांचे टरबुजाचे उत्पन्न मिळवण्याची किमया साधली आहे.
संजय आनंदा घरटे यांनी त्यांच्या शेतातील टरबूज थेट गुजरातच्या व्यापाऱ्यांनी खरेदी केल्याने हे टरबुज गुजरातला निघाले आहेत. संजय घरटे यांनी अडीच एकर क्षेत्रावर टरबूज पीक घेत यंदा चांगला नफा कमवला आहे. वेगळे पीक घेण्याचा त्यांचा प्रयत्न चांगलाच यशस्वी झाला आहे. दरवर्षी कापूस, मका पिकांसह इतर लागवड घरटे करतात. परंतु ,कपाशी पिकात त्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने टरबूज शेती करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीही त्यांनी शेतात टरबूज, पपईची लागवड केली होती.
टरबूज पीक 65 दिवसांचे झाल्याने वेलांना चार ते सहा किलो वजनाची फळे लागली आहेत. व्यापाऱ्यांमार्फत सध्या नऊ रुपये किलो दराने तोडणी करण्यात आली आहे. गुजरात, राजस्थान यासह इतर राज्यांत उन्हाळ्यामध्ये प्रचंड तापमान असते. त्यामुळे त्या परिसरामध्ये टरबुजाची मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्यात पहिल्या तोडणीला 35 टन टरबूज निघाले. चारशे रुपये टनप्रमाणे तोडणी गाडी भरण्यासाठी खर्च आला. शिवाय आणखी 10 ते 15 टन टरबूज निघण्याची शक्यता आहे.
यावर्षी टरबूजचे उत्पन्न चांगल्या प्रकारे निघाल्यामुळे शेतीचा झालेला खर्च वगळता उत्पन्न चांगले मिळाले आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत नव्याने प्रयोग करावेत.
संजय घरटे, शेतकरी, सामोडे, पिंपळनेर, धुळे
मला दोन मुली आहेत. पहिली मुलगी पुजा संजय घरटे पुणे येथे ॲग्रीकल्चर मधून पी.एच.डी.करत आहे. दुसरी मुलगी प्रिया संजय घरटे ही राहुरी विद्यापीठातुन बिटेक ॲग्रीकल्चर मधून फस्ट क्लास झाली असून ती एल.एल.बी. झाली आहे. मुलींच्या या ज्ञानाचा शेतीपिकामध्ये चांगला लाभ होतो ओह. मला मुलगा नाही. मी माझ्या मुलींमुळे प्रगती करत असल्याचा मला गर्व आहे. त्यामुळे मनात कुठलाही पश्चाताप नाही.