

पिंपळनेर,जि.धुळे : साक्री तालुक्यातील धंगाई येथे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याचे योग्य नियोजन अभावी तीव्र पाणीटंचाई भासत आहे. येथे महिलांना पाण्यासाठी पहाटेच्या 3 वाजेपासून गावाबाहेरील असलेल्या विहरीवर पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे शासनाच्या जल-जीवन मिशनचे 'हर घर नल,'हर घर जल, या योजनेचा बोजवारा झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
ग्रामसेवक धंगाई गावापर्यंत येत नसल्याची गावक-यांची तक्रार असून गावकऱ्यांना डबक्यात साचलेले दुषित पाणी प्यावे लागत आहे. मार्च महिना सुरु झाला असून दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. दापूर ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या धंगाई गावा बाहेरील विहीरीत दोर बादलीने पाणी काढून पायपीट करत गावात आणावे लागत आहे.
गावात पाण्याच्या नियोजनाचा आभाव दिसून येत आहे. ग्रामसेवकांचे गावाकडे लक्षच नाही. ते केवळ दापूर ग्रामपंचायत येथेच कामासाठी हजेरी देऊन निघून जातात, अशी तक्रार स्थानिक महिला व नागरीकांनी 'दै.पुढारी'च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली
धंगाई हे साक्री तालुक्यातील दापूर या ग्रामपंचायतीत असणारे गाव आहे. येथे कोकणी, भिल्ल समाज वस्ती असून सर्व हात मजूरीवर अवलंबून आहेत. मजुरीसाठी त्यांना पहाटेच घराबाहेर पडावे लागते. त्यामुळे पाण्यासाठी पहाटे अंधारातही पहाटे 3-4 वाजता घराबाहेर पडून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
येथे नव्याने पाणी पुरवठा योजना मंजूर असून पाण्याची टाकीही सक्रिय आहे. परंतु, पाणीटाकीत अद्याप पाणी पोहचलेच नाही. पाणीटाकीचे स्टेस्टस घेण्यात आलेले नाही. जुनी टाकी आहे परंतु, पाण्याच्या नियोजन अभावी एकाच गल्लीत, ठरावीक ठिकाणीच पाणीप्रवाह होतो त्यामुळे निम्मी गावकऱ्यांना पाणी पोहचतच नसल्याने त्यांना पाण्यासाठी वंचित रहावे लागत आहे.
पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरींना पाणी आहे. परंतु, नियोजन अभावी गावकऱ्यांना पाणी मिळत नाही. तर गावाबाहेरील विहीरीतील पाण्याने तळ गाठला असल्याने महिलांची पाण्यासाठी झुंबड उडत असते. पाण्यासाठी भांडणही होत असल्याच्या घटना सकाळ संध्याकाळ पाहायला मिळत आहेत.
आता मार्च महिना सुरू होवुन पंधरा दिवस झाले असून एप्रिल मे व जून पर्यंत पाणी कसे मिळेल यासाठी येथील नागरीकांनी साक्री पंचायत समितीवर हंडा मोर्चा नेण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.