

पिंपळनेर, जि. धुळे : नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा मिळाव्यात म्हणून शासन कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, जिथे-तिथे फोफावलेली भ्रष्ट वृत्ती आणि हलगर्जीपणामुळे विकासकामांमध्ये गंभीर त्रुटी समोर येत आहेत. पिंपळनेरातही याचाच अनुभव नागरिक घेत आहेत.
पिंपळनेरातील जे.टी. पॉइंट ते चौफुली दरम्यानच्या 1.5 किमी रस्त्याचे डांबरीकरण एमएसआरटीसीतर्फे गेल्याच महिन्यात 21 कोटी रुपये खर्चून करण्यात आले. पण पहिल्याच पावसात या रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून, जागोजागी खड्डे आणि साचलेले पाणी दिसत आहे. नागरिकांतून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
या रस्त्याची दुरवस्था आधीपासूनच होती. अपघातांचे प्रमाण वाढल्याने विविध आंदोलनांद्वारे प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर कामास सुरुवात झाली; पण गुणवत्तेचा अभाव स्पष्ट दिसतोय. रस्ता डांबरीकरणानंतर काही दिवसांतच पावसामुळे उखडला असून, त्यावर वापरलेली बारीक खडीही वर आली आहे. डांबराचे प्रमाण कमी की वापरच झाला नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
"रस्त्याच्या बाजूला मुरुम टाकल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचले. यामुळे डांबर टिकाव धरू शकले नाही. शिवाय, अजून एक लेयर टाकायचे काम बाकी आहे. देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी पाच वर्षांसाठी आमच्यावरच आहे. पाऊस थांवल्यावर रस्ता दुरुस्त करू."
इंजि. शरद माने, ठेकेदार प्रतिनिधी
काम करताना संबंधित यंत्रणांकडून कोणतीही निगराणी नव्हती. त्यामुळे ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले असून, जनतेच्या पैशांचा अपव्यय झाल्याचा आरोप होत आहे. "हेच का अच्छे दिन?" असा सवाल उपरोधाने विचारला जात आहे. संपूर्ण रस्ता पुन्हा गुणवत्तेनुसार तयार करावा आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.