

पिंपळनेर, जि. धुळे : साक्री तालुक्यातील लघडवाळ आणि छत्रपती शिवाजी महाराज नगर या दोन गावांतील महिलांनी दारू आणि जुगाराच्या वाढत्या व्यसनवाढीविरोधात एकत्र येत एल्गार पुकारला आहे. गावातील पुरुष दारू आणि जुगाराच्या विळख्यात अडकत चालले असून, यामुळे संसारातील कुटुंब प्रमुखाचा आधार कोसळत आहेत, मुलांचे भवितव्य अंधारात जात आहे, अशी व्यथा या महिलांनी मांडली.
लघडवाळ ग्रामपंचायतीच्या बचत गटातील महिला आणि दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी एकत्र येत याविरोधात ठाम भूमिका घेतली. त्यांनी साक्री पोलिस ठाण्यात निवेदन सादर करत गावात दारूबंदी लागू करण्याची आणि जुगाराच्या अड्ड्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
महिलांनी सांगितले की, गेल्या चार-पाच वर्षांपासून दोन्ही गावांमध्ये खुलेआम दारू विक्री व जुगार सुरू आहे. यामुळे अनेक पुरुष शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या खचले असून, निष्पाप बालकांचे आयुष्य उध्वस्त होत आहे. रोज होणारे घरगुती भांडण, आर्थिक बकालपणा आणि मुलांचे शिक्षण अडचणीत आले आहे. तसेच महिलांनी इशारा दिला आहे की, यापुढे जर कोणी गावात दारू विकताना किंवा जुगार खेळताना आढळल्यास त्यांच्यावर त्वरित आणि कठोर कारवाई करण्यात यावी. पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी त्यांची जोरदार मागणी आहे.
गावातील महिलांनी दाखवलेली एकजूट आणि संघर्ष बळ देणारा आहे. आता प्रश्न असा आहे की, साक्री पोलिस या रणरागिणींच्या भावनांचा मान ठेवून योग्य ती कारवाई कधी करणार? गावाच्या भविष्याचा प्रश्न गंभीर असताना, अवैध दारू आणि जुगारमुक्तीची मागणी पूर्ण होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.