

पिंपळनेर, जि. धुळे : संपूर्ण देशात जैन समाजावर होत असलेल्या अत्याचारांची मालिका व काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांच्या हत्येच्या निषेधार्थ पिंपळनेर येथील सकल जैन समाजातर्फे भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. आंदोलनादरम्यान पिंपळनेर शहर पूर्णपणे कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांत मध्य प्रदेशातील जैन साधूंना मारहाण, विलेपार्ले येथे जैन मंदिराची तोडफोड, तसेच रस्त्यावर विहार करत असलेल्या साधूंना अपघात घडवून देण्याचे प्रकार समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर सकल जैन समाजातर्फे निषेधार्थ हा मूक मोर्चा आयोजित करण्यात आला.
सटाणा रोडवरील महावीर भवन येथून भव्य मोर्चाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर हा मोर्चा सटाणा रोड, बसस्टॅंड, भावसार गल्ली, खोलगल्ली, गांधी चौक मार्गे तहसील कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी धनराज जैन यांनी सद्यस्थितीचे गांभीर्य विशद करत मोर्चाचे उद्दीष्ट अधोरेखित केले. महावीर गोगड आणि अशोक कोचर यांनी घटनांचा संदर्भ देत तीव्र निषेध व्यक्त केला. तहसील कार्यालयात अपर तहसीलदार दत्तात्रय शेजुळ यांना निवेदन देत निवेदनाद्वारे दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
निवेदनावर राजस्थान पंच मंडळ, जैन नवयुवक मंडळ आणि जैन महिला मंडळ यांच्यासह शेकडो समाजबांधवांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. सुभाष गोगड, जीवन खिवसरा, अजित गोगड, कमलेश गोगड, कुंदनमल गोगड, सुभाष राका, तुषार चोरडिया, नितीन बुरड, हर्षल गोगड, मनीष टाटीया, करिष्मा गोगड, पायल टाटीया आदींसह अनेकांनी मोर्चात सहभाग नोंदवला. या मूक मोर्चाच्या आयोजनात राजस्थान पंच मंडळ, जैन नवयुवक मंडळ व जैन महिला मंडळाच्या सदस्य देखील सहभागी होते.