

पिंपळनेर,जि.धुळे : येथील राजे छत्रपती मार्शल आर्टस् इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सात दिवसीय शिवकालीन मर्दानी युद्ध कला प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला.
विविध युद्ध कलेचे प्रात्यक्षिके सादर करून सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संभाजीराव अहिरराव होते. याप्रसंगी संस्थेचे संचालक रा.ना.पाटील, जगदीश ओझरकर, श्यामशेठ कोठावदे, प्राचार्य सोनाली पाटील, प्रशिक्षक राजू भोई, दर्पणा पाटील, केतकी अमोणकर उपस्थित होते.
मुलांच्या व मुलीच्या स्वसंरक्षणासाठी शिवकालीन युद्ध कलेच्या मर्दानी खेळांचे प्रशिक्षण जळगावचे राजू भोई यांनी दिले. लाठी काठी प्रशिक्षण, दांडपट्टा प्रशिक्षण, ढाल तलवार तसेच मुलींसाठी प्राथमिक संरक्षण कौशल्य, भालाफेक या शस्त्र व शास्त्रविद्या यांचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले. यात शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले. शस्त्रपूजन संचालक राणा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवीर संघाचे प्रमुख तथा प्रशिक्षक राज भोई म्हणाले, या प्रशिक्षणातून युद्ध कलेचा हा वारसा भविष्यात जतन करण्याची गरज आहे. संभाजी अहिराव म्हणाले, विद्यार्थ्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचा लाभ स्वसंरक्षणासाठी व समाज हितासाठी करावा. या कलेचा सराव आवश्यक आहे, कोणत्याही क्षेत्रात नैपुण्य मिळवण्याची संधी विद्यार्थ्यांनी दवडू नये. विद्यार्थ्यांनी चांगले नागरीक होण्याचे ज्ञान अशा कलेतून घ्यावे. याप्रसंगी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी बाळासाहेब गायकवाड, अभिषेक पवार, नितेश वळवी, सुस्मिता भवरे, पवार, उपशिक्षक कांबळे यांनी परिश्रम घेतले. अमोल अहिरे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.