पिंपळनेर,जि.धुळे : समर्थ सद्गुरू श्री खंडोजी महाराज नाम सप्ताह महोत्सवास सुरुवात झाली असून रविवार (दि.8) रोजी रात्री गणेश मंडळांनी पायदळी सोंग काढत नामसप्ताह उत्सवाची रंगत वाढवली. दरम्यान मंदिर संस्थांतर्फे विद्यार्थ्यांसाठी धार्मिक नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याने या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अष्टविनायक मित्र मंडळ, युवा संघर्ष मित्र मंडळाने श्रीगणेश, सरस्वती, सूर्य, चंद्र यांचा सजीव देखावा सादर केला. आदिवासी डफ, पिपाणीच्या पारंपरिक वाद्याच्या तालावर तरुणांनी ठेका धरला. गावाच्या मुख्य भागातून पायदळी सोंग मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
या स्पर्धेत लहान व मोठ्या गटांनी सहभाग नोंदवून रामायण व महाभारतातील सजिव धार्मिक नाट्य सादर केले. दोन दिवसीय नाट्य स्पर्धेत गावातील विविध शाळांनी सहभाग नोंदविला. यावेळी मठाधिपती योगेश्वर महाराज देशपांडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
नाम सप्ताह महोत्सवानिमित्त मंदिरात दिवसभर कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यानुसार बुधवार (दि.11) रोजी मध्यरात्री पालखी सोहळा होणार आहे. या दिवशी ट्रॅक्टर वहन काढण्यात येणार आहे. यासाठी विविध मंडळांनी तयारी सुरू केली आहे.
पिंपळनेर येथे समर्थ सद्गुरू खंडोजी महाराज नामसप्ताह महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. यासाठी दूरदूरवरुन भाविक येतात. मात्र, मंदिराकडे जाणाऱ्या प्रवेश मार्गावरच ठिकठिकाणी खड्डे झाल्याने पायदळी सोंग, भाविकांना मंदिरात येणे-जाणे त्रासदायक होत आहे. तसेच शहरातील विविध रस्त्यांचीही दुरवस्था झालेली आहे. मात्र, पिंपळनेर नगरपरिषदेकडून कुठलीही उपाययोजना झालेली नसल्याने भाविकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.