

पिंपळनेर,जि.धुळे : उदरनिर्वाहाची शेती न करता स्ट्रॉबेरी पिकासारख्या आधुनिक पीकपद्धतीकडे शेतकऱ्यांनी वळावे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केल्यास अन्नप्रक्रिया उद्योगासारख्या शासकीय योजनांची मदत घेता येईल, असे मत तालुका कृषी अधिकारी योगेश सोनवणे यांनी व्यक्त केले.
साक्री तालुक्यातील मांजरी येथील शेतकरी पंडित तुळशीराम ठाकरे यांच्या स्ट्रॉबेरी लागवड केलेल्या शेताला साक्री तालुका कृषी अधिकारी योगेश सोनवणे यांनी भेट दिली.त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ठाकरे यांच्याबरोबरच मागील काही वर्षापासून मांजरी परिसरातील दहा ते बारा शेतकरी स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेत आहेत.दुर्गम आदिवासी भागामधील शेतकऱ्यांनी केलेल्या स्ट्रॉबेरी लागवडीचा हा प्रयोग आदिवासी शेतकऱ्यांना पारंपरिक पीक पद्धतीकडून नवीन पीक पद्धतीकडे घेऊन जात आहे,याबद्दल श्री.सोनवणे यांनी समाधान व्यक्त केले.या वेळी मंडळ कृषी अधिकारी तानाजी सदगीर,कृषी पर्यवेक्षक शिवा राऊत,कृषी सहाय्यक सर्जेराव अकलाडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
स्ट्रॉबेरी हे नाशवंत पीक असल्याने दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी मर्यादा येतात. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी लागवड केली तर या परिसरातच स्ट्रॉबेरीवरील प्रक्रिया उद्योग उभारून स्ट्रॉबेरीचे प्रक्रियायुक्त पदार्थही शेतकऱ्यांना बनवता येतील. असे केल्याने शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल व दुर्गम आदिवासी भागातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल,असा आशावाद सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केला.