

पिंपळनेर,जि.धुळे : अनेक वर्षापासून साक्री तालुक्यातील साधन बाग असलेल्या काटवान भागातील सर्वच रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मात्र याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही. रस्त्याची कामे अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत.
साक्री ते म्हसदी, म्हसदी ते छाईल, विटाई हे रस्ते दोन प्रमुख जिल्ह्यांना जोडणारे व अनेक उद्योगधंद्यासाठी महत्त्वाचे असून दहा ते बारा वर्षांपासून आजपर्यंत या रस्त्यांचे कामे झालेली नाहीत. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे लोक येथील भागात येणे टाळत आहेत. परिणामी उद्योगाला चालना मिळत नाही. गंभीर रुग्णाला तात्काळ हलविता येत नाही अशा विविध समस्यांनी ग्रामस्थ त्रस्त झाले असल्याने रस्त्याचे काम होण्यासाठी आंदोलनाचे शस्त्र उपसण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही, वरिष्ठ नेत्यांनी श्रेयवाद सोडून या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय बहीरम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.