

पिंपळनेर ( जि.धुळे ) : साक्री तालुक्यातील जैताणे येथे अखिल भारतीय माळी महासंघातर्फे आयोजित कार्यक्रमात समाजातील तब्बल 50 गुणवंतांचा गुणगौरव करण्यात आला. माळी समाज मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नाशिक विभागीय अध्यक्ष वासुदेव देवरे यांनी भूषविले.
क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा संदेश पाठविला होता.
शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, मेडिकल, इंजिनिअरिंग, नेट-सेट, पीएचडी तसेच स्पर्धा परीक्षांत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याशिवाय कला, क्रीडा, संगीत, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, पोलीस, आजीमाजी सैनिक, प्रगतिशील शेतकरी आदी क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचाही विशेष गौरव करण्यात आला. मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे सन्मानपत्रे करण्यात आली. हा गुणगौरव सोहळा दरवर्षी साक्री, पिंपळनेर, दहिवेल व निजामपूर-जैताणे या चार ठिकाणी रोटेशन पद्धतीने आयोजित केला जाणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. दिवंगत मानद अध्यक्ष ॲड. संभाजीराव पगारे व उपाध्यक्ष संजय खैरनार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष आर.के. माळी, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. भगवान जगदाळे, महानगराध्यक्ष हरिश्चंद्र रेंडे, विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. भगवान जगदाळे यांनी केले, काशिनाथ माळी यांनी आभार मानले.