

पिंपळनेर,जि.धुळे : पिंपळनेर येथील नगरपरिषदेच्या अकार्यक्षम प्रशासकाच्या मनमानी कारभाराविषयी नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून संतप्त नागरिकांसह व्यापारी व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेला टाळे ठोकून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
शहरातील मूलभूत सुविधांच्या बाबतीत प्रशासन अधिकारी सुरुवातीपासूनच उदासीन असल्याचा अनुभव नागरिकांना आला आहे. वारंवार तक्रारी मांडून, समस्यांचा पाढा वाचून देखील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. शहरात मूलभूत सुविधांसह नागरिकांना होणाऱ्या इतर समस्यांच्या त्रासाबद्दल दुर्लक्ष करणारे नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी यांच्या विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या संतापाचा उद्रेक झाल्याची परिस्थिती पहावयास मिळाली. शहरात गेल्या सहा महिन्यांपासून इलेक्ट्रीक खांबावर लाईट नसल्याने गल्लीबोळ अंधारमय झाले असून मुख्य रस्त्यांवर अनेक दिवसांपासून दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहत असून यामुळे घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांना मूलभूत समस्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक वेळा नगरपरिषदेत गेल्यावर संबंधित अधिकारी भेटत नसल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या, नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करून मूलभूत सुविधा पुरवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासन अधिकारी बऱ्याच वेळा कार्यालयात मिळून येत नाहीत. त्यामुळे तक्रारी कोणाकडे सांगायच्या असा प्रश्न तरुणांनी व्यक्त केला. भाजपाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी नगरपरिषदेच्या मुख्य दरवाजाला टाळे लावून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. प्रशासनाने नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात अन्यथा यापुढेही तीव्र स्वरूपात जन आंदोलन उभारले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.