

पिंपळनेर,जि.धुळे : अंबादास बेनुस्कर
आदिवासी समाज हा मुलतः निसर्ग पूजक असून ते निसर्गाला आपला देव मानून वर्षभरात वेगवेगळ्या निसर्ग देवतांची पूजा करीत असतो. ऋतुचक्रानुसार एका वेळेस एकच सण उत्सवाची पूजा आदीवासी बांधव करीत असतो. पावसाळ्यात निलपी, निलीचारी, वाघदेव, बाघदेव, बावदेव हिवाळ्यात इंदल, आयुटी, गोवाण उन्हाळ्यात होळी आणि त्यासंबंधी अन्य सण उत्सव असा हा क्रम असतो.
होळी उत्सव सातपुडा पर्वतरांगेजील सावऱ्या दिगर ता.धडगाव जिल्हा नंदुरबार येथील आदिवासी बांधवांसाठी आनंदाची पर्वणीच असते. होळीला आदिवासी बांधव जीवता जागता (जागृत) देवता मानतात. होळीच्या एक महिन्याआधीच प्रत्येक गावात ज्या ठिकाणी होळी पेटविणार आहे तेथे दांडा रोवला जातो आणि एकदा का होळीचा दांडा रोवला की, कोणत्याही घरात शुभकार्य करण्यात येत नाही. या संपूर्ण महिन्याभरात जे काही बरे-वाईट होईल त्याची जबाबदारी होळी घेते, असा समज सातपुड्यातील आदिवासींचा आहे. त्यामुळे या महिन्यात कोणी आजारी पडले किंवा काही अघटित घडले की, समाजातील जाणकार बडवा, पुजारा यांचा सल्ला घेण्यात येतो आणि त्यांनी सुचविल्याप्रमाणे होळीला प्रसन्न करण्यासाठी आणि कुटुंबाबाबत नेराय (सुख-समृद्धी) येण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सोंग धारण केली जातात.
आदिवासी समाजातील जाणकारांनी सुचविल्याप्रमाणे होळीच्या एकूण उत्सव कालावधीत कोणी कशाचे सोंग घ्यायचे असते. बावा म्हणजे कमरेला डोवा (पारंपरिक भोपळा) याची माळ डोक्यावर बांबूपासून तयार केलेला टोप, हातात लाकडाचे तयार केलेले हत्यार असा त्यांचा वेश असतो तर त्यांची नाचण्याची लकबही वेगळी असते. बुध्याच्या डोक्यावर मोरपिसांपासून तयार केलेले टोप तर कमरेला मोठाले घुंगरू असतात आणि अंगावर वेगवेगळे दागिने असतात. यांच्याही नाचण्याची लकब वेगळी असते. किंबहुना कोणी कसे नाचावे याची संहिता परंपरागत चालत आलेली आहे. बावा-बुध्या (मोरखी) व्यतिरिक्त यामध्ये काली (तोंडाला काळे फासलेले पात्र) हातात सूप व चाटा घेऊन वेगवेगळ्या लकबीत नृत्य केले जाते.
या जगात आल्यानंतर कोणालाही काही ना काही होण्याची इच्छा असते. परंतु प्रत्येकाची इच्छा पूर्ण होतेच असे नाही. अर्थातच तेही समाजातील जाणकार व्यक्तीने सांगितल्यानंतरच तशी सोंग घेता येतात व होळीच्या गेर या प्रकारात मुख्य गेरचा आपला विशिष्ट असा पेहराव असतो.मात्र अन्य मंडळी कोणत्याही प्रकारचा वेश परिधान करू शकतात.पुरुष-स्त्री होऊ शकतो अन्य वेगवेगळे सोंग घेऊ शकतो.वरील सर्व सोंग घेण्यापूर्वी पुजाराच्या सांगण्यानुसार नऊ,नऊ,सात, पाच,तीन दिवस कठीण पथ्य पाळावे लागते.पथ्याचे पालन काटेकोरपणे केल्यास कसलीच अडचण येत नाही. मात्र कर्तव्यात (पालनीत) कसूर केल्यास होळी उत्सवात सोंग घेणाऱ्यास धोका निर्माण होऊ शकतो आणि तसे प्रत्यक्ष घडल्याचे आदिवासींचे मानणे आहे.
(छाया : अंबादास बेनुस्कर)
पिंपळनेर,जि.धुळे सातपुड्यातील आदिवासी बांधवांशी होळी हा उत्सव अत्यंत जीवलगाचा मानला जातो.त्यामुळे आदिवासी संपूर्ण महिनाभरात पवित्र भावना ठेवून होळी उत्सव साजरा करण्यास सिद्ध होतो. या कालावधीत आदिवासींमध्ये कमालीची सामूहिकता दिसून येते.
सावऱ्या दिगर, सातपुड्यात नर्मदा नदीच्या परिसरातील प्रत्येक गावात होळी पेटविण्यात येते. अपवादात्मक कालावधीत गावात दुःखद घटना घडल्यास किंवा अन्य कारणासाठी गौऱ्यांची होळी केली जाते.तिला लहान होळी म्हणतात.गावात मोठी होळी असल्यास होळीच्या आदल्या दिवशी प्रत्येक घरातून टेंभुर्णीच्या लाकडाची एक मोळी न सांगता होळीच्या ठिकाणी आणून देण्यात येते.बांबूची होळी उभे करणे, खड्डा खोदणे, लाकडे रचणे यासाठी कोणालाही काहीही सांगावे लागत नाही.प्रत्येक गावकरी आपले घरचे काम असल्यासारखे अत्यंत मनमोकळेपणाने काम करीत असतो.या प्रसंगी सुमारे 25 ते 30 किलो वजन असलेला ढोल गळ्यात अडकवून वाजविले जात होते. होळीत रोवलेला बांबूचा दांडा खाली पडल्यानंतर त्याचा एकाच घावात तुकडा करण्याचा मानही अनेकांना मिळाला. पहाटे होळी पेटवितांनाही सामूहिकतेची भावना असते. प्रत्येक घरातून होळीच्या दिवशी जे अन्न शिजले असेल त्याचे प्रथम ताट होळीच्या ठिकाणी आणले जाते. सकाळी सर्व ताटांचे एकत्रित मिक्षण केले जाते. त्याचा प्रसाद केला जातो. त्याला पारणं असे म्हणतात. सर्वांचा स्नेह मिसळलेला या सर्व ताटातील मिश्रणाच्या प्रसादाला वेगळीच चव असते,असे समाजाचे मानणे आहे.होळी पेटवण्यात आली व गावागावातून आलेल्या बावा- बुध्यांनी होळीभोवती फेर धरला
सावऱ्या दिगर ता.धडगाव जिल्हा नंदुरबार येथे मेधाताई पाटकर व वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या पाहुण्यांनी होळी साजरी केली.
यात अमळनेरचे अहिराणी साहित्यिक,अभिनेता प्रकाश पाटील पिंगळवाडेकर, ज्येष्ठ पत्रकार साथी बापू ठाकूर धुळे येथून आलेले, युक्रांदचे साथी दिलीप पवार, राष्ट्र सेवादलाचे साथी, रमेश पाकड, जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत नाना सैंदाणे पैलवान, सिंधी समाजाचे कार्यकर्ते राजकुमार गुरूबक्षाणी, डॉ.पापालाल पवार, गो पी लांडगे ज्येष्ठ पत्रकार एकला चलो रे चे संपादक, मध्यप्रदेशातून आलेले भगवान भाई, येडूबाबा, हरेसिंग भाई दरबार, सँच्युरी मिल्सचे शाम भदाणे, गजानन मुजालदे व टीम सहभागी झाले.
रात्री होळीसाठी उपस्थित असलेल्या स्त्री,पुरुष यांच्यासमोर सभा घेण्यात आली. यात अहिराणी भाषेचे सुपरस्टार कलावंत प्रकाश पाटील यांनी शेतकऱ्यांची कविता सादर केली. मेधा पाटकर यांनी आपले जल, जंगल जमीन वाचावीत आपली संस्कृती चे जतन करावे असे सांगत सावऱ्या दिगर,जीवन नगर गोपाळपूर पुनर्वसन वसाहतींना दारूबंदी केली त्याचे कौतुक करीत इतर ही गावात दारूबंदी झाली पाहिजे म्हणून दारूची बाटली फोडत दारूचा निषेध करण्यात आला व दारू नको, पाणी पाहिजे, शराब का व्यापार बंद करे सरकार अशा घोषणा देण्यात आल्या.तसेच सावऱ्या दिगरचा पूल 2005 पासून अद्यापही पूर्ण झाला नाही याचा निषेध देखील करण्यात आला.
आलेल्या पाहुण्यांना ढोल वाजवण्याचा व ढोलाच्या तालावर नाचण्याचा मोह आवरू शकले नाहीत. रात्रभर ढोल पावाचा नाद सातपुडा पर्वंतरांगेत गुंजत होता. पहाटे होळी पेटवण्यात आली व गावागावातून आलेल्या बावा- बुध्यांनी होळीभोवती फेर धरला व अवघे वातावरण होळीमय झाले. गूळ, डाळ्यांचा नैवेद्य होळीत वाहण्यात आला.
होळी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राड्या पावरा, ठाणसिंग पावरा,पंचायत सदस्य, रोहीदास पावरा, रमेश पावरा, मान्या पावरा, छगन पावरा, नर्मदा बचाओ आंदोलनाचे लतिका राजपूत, चेतन साळवे विरसिंग पावरा, विजय वळवी यांनी नियोजन केले.