

पिंपळनेर,जि.धुळे : येथे सामाजिक एकता आणि सद्भावनेचा संदेश देण्यासाठी भरत बागुल आणि डॉ. प्रशांत बागुल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात विविध धर्मीय नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती,सामाजिक कार्यकर्ते आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रमजान हा मुस्लिम समाजासाठी पवित्र महिना असून,या काळात उपवास (रोजा)धरले जातात आणि संध्याकाळी इफ्तारच्या माध्यमातून उपवास सोडला जातो.समाजात बंधुभाव आणि ऐक्य वाढावे, या उद्देशाने भरत बागुल व डॉ. प्रशांत बागुल यांनी पुढाकार घेत इफ्तार पार्टीचे आयोजन केले.हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात एकोप्याचे अद्वितीय दृश्य पाहायला मिळाले.
या कार्यक्रमात शहरातील विविध समाजातील मान्यवर उपस्थित होते.सर्वांनी एकत्र येऊन इफ्तार केला आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत हिंदू-मुस्लिम ऐक्याची गरज आणि त्याचे महत्त्व यावर भाष्य केले. "धर्म हा जोडण्यासाठी असतो, तोडण्यासाठी नाही," असे सांगत डॉ.प्रशांत बागुल यांनी सर्वांना सलोखा आणि प्रेम यांचे महत्त्व पटवून दिले.
भरत बागुल यांनी आपल्या भाषणात असे सांगितले की, "पिंपळनेर हे ऐक्याचे प्रतीक आहे.येथे सर्वधर्मीय लोक प्रेमाने आणि एकोप्याने राहतात.इफ्तार पार्टीचे आयोजन म्हणजे फक्त धार्मिक सोहळा नसून सामाजिक बंध मजबूत करण्याचा एक प्रयत्न आहे. असे उपक्रम सातत्याने होणे गरजेचे आहे,जेणेकरून समाजात प्रेम आणि बंधुत्व कायम राहील."
या इफ्तार पार्टीत सुमारे 200 हून अधिक नागरिक सहभागी झाले होते.खजूर,फळे, फराळाचे पदार्थ आणि शीतपेयांचा यामध्ये समावेश होता.उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले आणि पुढेही असेच उपक्रम सातत्याने व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली.
सामाजिक सलोखा,ऐक्य आणि सौहार्द यांचे दर्शन घडवणारा हा सोहळा पिंपळनेरच्या इतिहासात एक संस्मरणीय क्षण ठरला.
डॉ.प्रशांत बागुल पिंपळनेर, धुळे.