

पिंपळनेर, जि.धुळे : साक्री तालुक्यातील दुसाणे महावितरणची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे हुक (आकडा) टाकून विजेचा वापर करणाऱ्या दोन जणांविरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बेकायदेशीर कृत्यामुळे गावातील सहा वर्षीय बालकाला विजेचा शॉक बसून गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे.
वीज कंपनीचे सहायक अभियंता हेमंत ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कैलास दगा महाले (रा.दुसाणे) आणि दीपक झोपा भदाणे (रा.भदाणे) यांनी त्यांच्या विहिरीतील जलपरीसाठी दुसाणे गावातील ईलेक्ट्रीक डीपी क्र.4212305 येथून सप्लाय घेत तिसऱ्या पोलवर हुक (आकडा) टाकून बीज वापर सुरू ठेवला होता. मात्र, वायर तुटलेली असल्याचे त्यांना माहीत असतानाही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तुटलेल्या वायरमुळे गावातील सचिन संजय मालचे (वय 6) यास शॉक लागला आणि तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी कैलास महाले आणि दीपक भदाणे यांच्याविरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी.पी.सोनवणे हे करीत आहेत.