पिंपळनेर, जि.धुळे : सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे यांच्याकडून मंगळवार (दि.27) रोजी ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली. या निविदेमध्ये सर्व कामे मंजूर करण्यात आली असून धक्कादायक बाब म्हणजे एकाच रस्त्यावरील 4 ते 5 मंजूर कामांची तुकडे करण्यात आलेले आहे.
हिवाळी अधिवेशन 2023-24 मध्ये साक्री तालुक्यातील आदिवासी भागातील नवीन रस्ते व पुलांचे कामे मंजूर झाली होती. या कामांवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एकाच रस्त्यावर 4 ते 5 तुकडे करून 10 ते 11 लाख रुपयांचे अंदाजपत्रक करण्यात आले आहे. त्यामुळे या कामात काय गौडबंगाल आहे याची खात्री करण्यासाठी अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे यांना 22 डिसेंबर 2023 रोजी निवेदन देण्यात आले होते. एकाच रस्त्यावरील सर्व काम एकत्र करून निविदा प्रसिद्ध करावी अशी विनंती केली होती. परंतु सार्वजनिक बांधकाम उपविभाग पिंपळनेर यांच्याकडून शासनाचे सर्व नियम मोडून ठेकेदारांकडून टक्केवारी खाण्याच्या उद्देशाने 10 लाखाचे तुकडे करण्यात आले. त्यामुळे मंगळवार (दि.27) रोजी प्रसिद्ध झालेल्या ई-निविदा क्र.12 मध्ये सुमारे 57 कामे हाती घेण्यात आलेली आहेत. ई-निविदा क्र.11 सन 2024-25 मध्ये 11 कामांचा समावेश केला आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून निविदा रद्द करण्याचे त्वरित आदेश द्यावे व एकाच रस्त्यावरील सर्व कामे एकत्रित ई-निविदा प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. या प्रकरणी शासनाच्या नियमांचे उल्लंघन करण्याऱ्यांवर कडक कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे शिवसेना धुळे जिल्हा सहसंपर्कप्रमुख विशाल दिसले यांनी केली आहे.