

पिंपळनेर, जि.धुळे : यंदाच्या वर्षी तुळशीविवाह सोहळा पार पडल्यानंतर ग्रामीण भागात लग्नसराई तसेच यात्रांचा हंगाम धूमधडाक्यात सुरू झाला आहे. पोलिस प्रशासनाने डिजिटल साउंड सिस्टीमवर निर्बंध घातल्यामुळे पारंपरिक वाद्यांना लग्नसराईच्या काळात मोठी मागणी वाढल्याने वाजंत्री मंडळींना पुन्हा एकदा 'अच्छे दिन' आल्याचे चित्र दिसून येत आहे. नवीन वर्षात जूनपर्यंत विवाहयोग्य 42 मुहूर्त आहेत. यातील सुमारे 21 मुहूर्त फेब्रुवारी व मे महिन्यांत आहेत. लग्न इच्छुकांच्या डोक्यावर यंदा आतापासूनच अक्षता पडण्यास आरंभ झाला आहे.
18 नोव्हेंबरपासून लग्न सोहळ्याच्या मुहूर्ताला प्रारंभ झाला. जानेवारी ते जूनदरम्यान लग्नासाठी एकूण 42 मुहूर्त आहेत. त्या अनुषंगाने इच्छुकांची तयारी सुरू झाली आहे. फेब्रुवारीमध्ये 18 तर मे महिन्यात 11 मिळून एकूण 21 असे मुहूर्त आहेत. सर्वांत कमी मुहूर्त मार्च व जूनमध्ये आहेत. मे महिन्यात शाळा-महाविद्यालयांना सुटी असल्यामुळे या महिन्यातील मुहूर्त साधण्यात येतात. गेल्या 'मे' मध्ये नेमके मुहूर्त नव्हते. मात्र, यंदा 2025 वर्षात 'मे' महिन्यात मुहूर्त अधिक असल्याने सर्वाधिक लग्न मे महिन्यातच होण्याची शक्यता आहे.
लग्न समारंभात आता पूर्वीप्रमाणेच सनई ,ताशा, संबळ, हलगी, डफ तसेच बँड, बँजो अशा पारंपरिक वाद्यांचा सूर कानी ऐकू येत आहे. गेल्या चार-पाच वर्षांत पारंपरिक वाजंत्रींची मागणी वाढत असल्याचा नवा ट्रेंड दिसत आहे. पारंपरिक वाजंत्री मंडळींना वर्षभरात केवळ लग्नसराईचा हंगाम मिळतो. यामध्येच ते कमाई करू शकतात.अलीकडच्या काळात वाजंत्री कलाकारांना चांगले पैसे मिळत आहेत. एका दिवसाची लग्नाची सुपारी 15 हजार ते 22 हजार रुपयांपर्यंत घेतली जात आहे. वाजंत्री कलाकारांच्या एका ताफ्यात सहा ते सात वाजंत्री कलाकार असतात. ताफ्यातील सर्व कलाकारांना एक सारखा पोशाख, स्वतंत्र वाहनाची व्यवस्था असे बदल करून अधिक कालसुसंगत होण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होताना दिसतो. साहजिकच लग्न समारंभांमध्ये वाजंत्री मंडळींचे आकर्षण वाढत आहे.
ध्वनी प्रदूषणामुळे आर्टियल हायपरटेंशन म्हणजेच हृदयावर ताण येणे, मायोकार्डियल इंफ्रेंक्शन म्हणजे हार्ट अटॅक येणे किंवा स्ट्रोकसारखे त्रास होऊ शकतात. तसेच रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. हृदयाची धडधड वाढते आणि हार्मोन्सच्या पातळीत बदल होतो. सतत मोठ्या आवाजात जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो, हे सर्व धोके नागरिकांना समजल्याने आता वधू-वर पक्षाकडून पारंपरिक वाद्यांना मागणी वाढली आहे.
समाजात काही शुभविवाह सोहळ्यात वधू-वरांच्या मिरवणुका पारंपरिक वाद्यांना फाटा देऊन आणि नियमाचे भंग करून डॉल्बीयुक्त लवाजम्यासह निघत आहेत. अशा मिरवणुकांकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. कारण यामुळे मिरवणुकीत सामील झालेल्यांसह मार्गावरील नागरिक व महिलांच्या छातीत धडधड होते. काही हृदय रुग्णांवर उपचार सुरू असताना अशा डॉल्बीमुळे विपरित परिणाम होत असतो. म्हणून अशा नियमांचे पालन न करणाऱ्या डॉल्बी पथकांवर कडक कारवाई करण्याची मागणी आहे.