

पिंपळनेर, जि. धुळे : पिंपळनेर-दहिवेल रस्त्यावर चिंचपाडा येथे कांदा काढण्यासाठी गेलेल्या महिला मजुरांच्या रिक्षाला नवापूर-नाशिक मार्गावरील एसटी बसने जोरदार धडक दिली. या अपघातात 21 महिला मजूर आणि रिक्षाचालक जखमी झाले असून, ही घटना शनिवारी (दि.26) रोजी सायंकाळी घडली.
चिंचपाडा येथे विविध भागांतील महिला कांदा काढणीसाठी गेल्या होत्या. काम आटोपल्यानंतर त्या धनाईकडे जाण्यासाठी (एमएच 41 एल 3551) क्रमांकाच्या रिक्षाने निघाल्या होत्या. दरम्यान, नवापूरहून नाशिककडे जाणारी (एमएच 14 बीटी 1830 ) क्रमांकाची एसटी बस रिक्षाला मागून धडकली. धडक इतकी जोरदार होती की रिक्षा रस्त्याच्या बाजूला उलटली आणि रिक्षातील महिला मजूर रस्त्यावर पडल्या.
अपघातात एक पुरुष रिक्षाचालक व 21 महिला मजूर जखमी झाले आहेत. जखमींवर दहिवेल आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर जखमींपैकी आठ महिलांना अधिक उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.