

धुळे: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी धुळे शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व आमदार अनुप अग्रवाल यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून या मोर्च्याला सुरुवात झाली. राष्ट्रभक्तीने भारावलेल्या हजारो नागरिकांनी हातात काळे झेंडे आणि धगधगत्या मशाली घेत रस्त्यावर उतरत जोरदार घोषणा दिल्या. "भारत माता की जय", "पाकिस्तान मुर्दाबाद", "अतिरेक्यांचा नाश होवो" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मोर्चा आग्रा रोडने महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत नेण्यात आला.
महात्मा गांधी पुतळ्याजवळ झालेल्या जाहीर सभेत पाकिस्तानचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांनी सांगितले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या काळात पाकिस्तानप्रेमी अतिरेक्यांना निश्चितच धडा शिकवतील. मात्र, हिंदू समाजाने देखील एकसंघ राहून या देशद्रोही शक्तींचा कायमचा बंदोबस्त करायला हवा."
मोर्चा समारोपाच्या वेळी पहलगाम हल्ल्यात शाहिद झालेल्या नागरिकांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. देशभक्तीच्या वातावरणात उपस्थितांनी भारतमातेच्या रक्षणासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली.