

पिंपळनेर,जि.धुळे : गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर बल्हाणे रोडवर असलेल्या पिंपळनेर उपबाजार समितीत कांदा खरेदीस प्रारंभ होणार आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल साई कृष्णा रिसोर्टच्या पुढे बल्हाणे रोड, पिंपळनेर येथील उपबाजार समितीत आणावा, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे. याबाबत साक्री बाजार समितीत बैठक घेण्यात आली.
या बैठकीत उपसभापती भानुदास गांगुर्डे, संचालक किरण कोठावदे, जितेंद्र बिरारीस, सचिव भूषण बच्छाव, शाखा प्रमुख विशाल देसले, व्यापारी संदिप गांगुर्डे, रावसाहेब घरटे, लक्ष्मण पाटील, बाळासाहेब पाटील, आबा राणे, अनिल कोठावदे, अरुण नंदन, बबलू नंदन, हरिदास शिरसाठ, पंकज बिरारीस, सौरव शिरसाठ आदी उपस्थित होते.
बैठकीत शेतकरी हिताचे काही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात कांदा वाहन लावण्याचे कोणतेही गेटपास एंट्री फी घेतली जाणार नाही. सर्व शेतकरी बांधवांना कांदा विक्रीचे पेमेंट रोखीने अदा करण्यात येईल. शेतकऱ्यांचे हिशोबातून सेवा शुल्क किंवा इतर शुल्क कपात केले जाणार नाही असे काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. सकाळी साडेनऊ वाजेपासून लिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्याकडील कांदासह शेतमाल आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.