NCP leader Sharad Pawar : सरकारकडून सत्तेचा गैरवापर

सरकारकडून सत्तेचा गैरवापर, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा धुळ्यात आरोप
शिंदखेडा, धुळे
शिंदखेडा येथील शेतकरी मेळाव्यात संवाद साधताना राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार.pudhari news network
Published on
Updated on

धुळे : सध्या देशापुढे महागाई, बेरोजगारी, शेतमालाचा हमीभाव अशा अनेक समस्या असताना सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात धोरण राबवत आहे. अनेक ठिकाणी सत्तेचा गैरवापर झाल्याची उदाहरणे दिसून येतात. सत्ता ही जनतेची सेवा करण्यासाठी असते. पण सत्तेचा माज डोक्यात गेल्यानंतर त्याचा गैरवापर सुरू होतो. असा उन्माद चढलेल्या लोकांना त्यांची जागा दाखवण्याचे काम जनतेला करावे लागेल, असे आवाहन राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी केले तसेच विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

शिंदखेडा येथे रविवार (दि.15) शेतकरी मेळावा आणि भजनी मंडळांना साहित्य वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस संदीप बेडसे यांच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी, धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले, ग्रामीण जिल्हाध्यक्ष जितेंद्र ठाकूर ,जिल्हा परिषदेचे माजी गटनेते कामराज निकम, दोंडाईचा माजी नगराध्यक्ष जुई देशमुख, डॉक्टर जितेंद्र ठाकूर, एन सी पाटील, नंदू येलमामे, सभापती हेमलता शितोळे, जोसेफ मलबारी, दिलीप सोनवणे, मध्य प्रदेशातील आमदार सोळंकी, युवक आघाडीचे अध्यक्ष मनोज महाजन, धुळ्याच्या माजी महापौर कल्पना महाले आदी उपस्थित होते.

... हे सरकार बळीराजाच्या विरोधात

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंगच फुंकले. शिंदखेडा हा कष्टकरी शेतकरी यांचा परिसर आहे. शेतीमध्ये इमान राखून कष्ट करायचे. त्यावर आपला संसार चालवण्याचे काम या तालुक्यातील जनता करते. पण अलीकडच्या काळात राज्यकर्ते शेती संबंधात आस्था ठेवत नाही. सरकारची अनेक धोरणे ही शेतकरी हिताची नाहीत. कांदा हे शेतकऱ्याचे महत्त्वाचे पीक आहे. तर सामान्य जनतेचे खाद्य देखील आहे. परंतु मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी कांद्याच्या संदर्भात चुकीची धोरणे राबवली. शेतकऱ्यांनी पिकवलेला कांद्याला अपेक्षित भाव मिळावा, ही त्यांची रास्त मागणी आहे. पण सरकारने निर्यात बंदी करून शेतकऱ्यांना अडचणीत आणले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील अशाच पद्धतीने अडचणीत आणण्याचे काम सरकारने केले आहे. त्याचप्रमाणे गहू आणि तांदूळ या उत्पादनासंदर्भात देखील शेतकरी हिताच्या विरोधात धोरणे घेतली. शेतकरी हा पिकवता धनी आहे. मात्र त्याच्या पिकाला किंमतच मिळू द्यायची नाही, हे मोदी सरकारचे धोरण आहे. हे सरकार बळीराजाच्या विरोधात आहे.

कृषी मंत्री असताना भारत गहू निर्यात करणारा दुसऱ्या क्रमांकावरचा देश

आपण देखील दहा वर्ष देशाचे शेतीचा कारभार पाहिला. कृषी मंत्री पदाची जबाबदारी असताना अमेरिकेतला गहू भारतात आणण्याचा विषय माझ्यासमोर आला. त्यामुळे मला दुःख झाले. मी शेतकरी परिवारातला आहे. हा देश बळीराजाचा देश आहे. या देशात परदेशातून अन्न आणावे लागते, ही बाब मनाला पटत नव्हती. पण हे आव्हान स्वीकारले. आम्ही गहू, तांदळाला दाम दिला. तसेच शेतकऱ्यांची संदर्भात योग्य धोरण राबवले. त्यामुळे 2014 मध्ये भारत हा जगात गहू निर्यात करणारा दोन नंबरचा देश झाला. हे सर्व बळीराजाच्या साथीमुळेच शक्य होऊ शकले. याच कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात आपण सरकारच्या माध्यमातून निर्णय घेतले. शेतकऱ्यांवर 71 हजार कोटी रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज सावकाराच्या कर्जामुळे होते. ही बाब निदर्शनास आल्यानेच आपण कर्जमाफी केली. असे करत असताना वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना देखील आपण सवलत देण्याचे काम केले. पण सध्याचे सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात धोरण राबवत आहे, असा आरोप शरद पवार यांनी यावेळी केला.

 या सरकारकडून सत्तेचा गैरवापर 

शिंदखेडा तालुक्यात सत्तेचा गैरवापर होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. या तालुक्यात वीस वर्ष एकाच व्यक्तीला जनतेने आमदार केले. मात्र त्याने शेतकऱ्यांचा विकास करण्याऐवजी आमदारकीचा वापर त्रास देण्यासाठी केलेला आहे. गुंडगिरी आणि सत्तेचा गैरवापर केला आहे. राज्याचे माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते हेमंत देशमुख यांच्यासारख्या 87 वर्षाच्या नेत्याला 144 दिवस तुरुंगात राहावे लागले. त्यांच्यावर अनेक खोटे खटले दाखल झाले. यावरून सत्तेचा कसा गैरवापर होतो ,हे दिसून येते. राज्यातील बहुसंख्य ठिकाणी हीच परिस्थिती दिसून येते. सत्ता ही जनतेच्या सेवा करण्यासाठी असते. मात्र सत्तेचा माज डोक्यात गेला, तर त्यातून गैरवापर सुरू होतो. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना जनतेने आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. राज्यात दर दिवशी महिला आणि मुलींवर अत्याचार होण्याच्या घटना वाढत आहेत .लाडकी बहीण या योजनेच्या नावाखाली 1500 रुपये देणे ठीक आहे. मात्र त्याहीपेक्षा आमच्या भगिनींची अब्रू वाचवणे, त्यांना संरक्षण देणे ही महत्त्वाची गरज आहे. पण महिला वर्गाची फसवणूक करण्याचे काम सरकारच्या माध्यमातून सुरू असल्याचा टोला देखील शरद पवार यांनी लगावला.

शिंदखेडा, धुळे
वारकरी भजनी मंडळाचा सन्मान करताना राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार pudhari news network

राज्यात भजनी मंडळाचा आदर्श आहे. वारकरी उन्हाची पावसाची पर्वा न करता पांडुरंगाच्या दर्शनासाठी व चंद्रभागेच्या स्नानासाठी वारीत सहभागी होतो. पांडुरंगाच्या पायाचे दर्शन घेण्यासाठी श्रम करतो. वारकरी हे संतवाणी मधून एक वाक्यता निर्माण करतात. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे, ही फार मोठी उपलब्धी आहे. देश आणि राज्यात अनेक समस्या आहेत. महागाई, बेकारीचे संकट आहे. मात्र हे दूर करण्यासाठी सरकार पावले उचलत नाही. चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता आहे. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा जनतेने त्यांच्या हातातून सत्ता काढून महाविकास आघाडीला संधी दिली पाहिजे. राज्याची सत्ता हातात आल्यास राज्याचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले.

जुई देशमुख यांनी राज्याचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांनी पाठवलेल्या लिखित भाषणाचा अंश वाचून दाखवला. यात गेल्या वीस वर्षात शिंदखेडा तालुक्यात सत्तेचा गैरवापर करून अनेकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, असा आरोप करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शिंदखेडा तालुक्यातील सिंचनाचा विकास व विकासाची पायाभूत कामे देखील झाली नाही. त्यामुळे जनतेच्या सहकार्याने तालुक्यात परिवर्तन घडणार असल्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर बोलताना कामराज निकम यांनी देखील शिंदखेडा तालुक्यात गेल्या वीस वर्षात एक गाव देखील टँकर मुक्त करता आले नाही. आता तेच लोक फसव्या घोषणा करीत असल्याची टीका केली. तसेच संदीप बेडसे यांनी बोलताना शिंदखेडा तालुक्यात 163 गाव असून यातील 173 भजनी मंडळांना साहित्य वाटप होत आहे. वारकरी हाच शेतकरी असून समाजात एकोपा आणि शांतता निर्माण करण्याचे काम या माध्यमातून केले जाते. या कामाचा सन्मान आज होत असल्याचे त्यांनी सांगितले.

अरुणभाई गुजराथी यांनी देखील केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणावर टीका केली. राज्यावर महाविकास आघाडीच्या काळात 80 हजार कोटीचे कर्ज होते. पण आता हे कर्ज आठ लाख कोटीच्या घरामध्ये गेले आहे. त्यात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 46 हजार कोटी रुपये कुठून आणतील, याची माहिती सरकार देत नाही. याविषयी श्वेतपत्रिका काढली पाहिजे. सरकारी योजनांच्यासाठी जाहिरातीवर भरमसाठ खर्च सुरू आहे ,अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news