

नंदुरबार : 'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना' या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले संदेश निराधार असून, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनोद वळवी यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
या अफवांनुसार, 1 मार्च 2020 पासून ज्या मुलांचे एक किंवा दोन्ही पालक वारले आहेत आणि वय 18 वर्षांखालील आहे, अशा दोन मुलांना दरमहा प्रत्येकी 4,000 रुपये दिले जातील, असा खोटा दावा केला जात आहे. त्यामुळे नागरिक, पत्रकार आणि समाजकार्यकर्त्यांकडून या योजनेबाबत वारंवार चौकशी केली जात आहे.
महिला व बाल विकास विभागामार्फत 'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना' या नावाची कोणतीही योजना सध्या राबविण्यात येत नाही. तसेच, यासंदर्भात कोणताही शासन निर्णय अथवा परिपत्रक काढण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा खोट्या माहितीपासून सावध राहावे व कोणत्याही भ्रमात पडू नये, असे आवाहन वळवी यांनी केले आहे.
सद्यस्थितीत जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयामार्फत ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना’ राबविण्यात येत आहे. 0 ते 18 वयोगटातील एकपालक, अनाथ, दोन्ही पालक गमावलेली मुले तसेच बंदीपाल्य बालक (कैद्यांची मुले) या निकषांनुसार पात्र असलेल्या बालकांना दरमहा 2,250 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात DBT प्रणालीद्वारे जमा केले जातात.
या योजनेसाठी पात्र असलेल्या बालकांचे पालक किंवा पालकविना असलेल्या मुलांसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींनी अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही वळवी यांनी यावेळी केले