

धुळे : राज्यातील विरोधी पक्षातील नेते सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात विधिमंडळात आणि बाहेर आवाज उठवतात. धुळे शहरातील विश्रामगृहामध्ये घडलेल्या प्रकरणातून सरकारच्या लाचखोरीचे प्रकरण बाहेर आले आहे. त्यांच्यावर विरोधी पक्षाचे नेते बोलणार नसतील, तर त्यांनी स्वतःला सरकारमध्ये विलीन झाल्याचे जाहीर करावे, असा घणाघात खा. संजय राऊत यांनी केला. तसेच हे प्रकरण दाबले जाऊ देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येथील शासकीय विश्रामगृहात खा. राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी आ. अशोक धात्रक, माजी आ. अनिल गोटे आदी उपस्थित होते.
खा. राऊत म्हणाले की, येथील शासकीय विश्रामगृहात आढळलेल्या बेहिशेबी रोकड प्रकरणात पोलिस प्रशासनाने नऊ दिवसांनंतर गुन्हा दाखल केला. त्यात राज्याच्या अंदाज समितीतील अध्यक्षाच्या स्वीय सहायकाकडे एक कोटी 84 लाखांची रोकड सापडते. या खोलीत शासकीय अधिकारी आणि ठेकेदार यांच्या माध्यमातून पैसा गोळा केला. यातील 10 कोटी रुपये जालन्यात जमा करायचे होते, अशी माहिती आहे. पण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस हे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून तुरुंगात धाडण्याची वल्गना करत होते. धुळ्याच्या प्रकरणात त्यांनी किती जणांना तुरुंगात टाकले. या प्रकरणाची चौकशी करणारी एसआयटी कुठे आहे. या समितीचे प्रमुख कोण आहेत. तसेच त्याची कालमर्यादा काय आहे, असे प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले. त दरम्यान, राज ठाकरे यांच्याशी एकत्र येण्याबाबत सकारात्मक प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.