Mazi Ladki Bahin Yojna | धुळ्यात 27 हजार 131 महिला लाभार्थ्यांची नोंदणी

लाडकी बहीण योजनेअंतर्गत धुळ्यात 27 हजार 131 महिला लाभार्थ्यांची नोंदणी
Ladki Bahin Yojana
"माझी लाडकी बहीण योजना" लाभार्थींची 'निवड' Phdhari Photo

धुळे: राज्य शासनामार्फत ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी धुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत 27 हजार 131 महिलांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या अर्जामध्ये 14 हजार 211 महिलांनी ऑफलाईन तर 8 हजार 999 महिलांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. (Mazi Ladki Bahin Yojna) वैयक्तिक व शासकीय यंत्रणा बाहेरील व्यक्तीं व्यतिरिक्त ही संख्या प्राप्त झाली आहे. प्राप्त अर्जांची छाननी सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यातील 2 हजार 338 अंगणवाडी केंद्रातून धुळे तालुक्यात 5 हजार 238, शिंदखेडा 1374, शिरपूर 6 हजार 833, साक्री 9 हजार 540, धुळे नागरी 2 हजार 728, धुळे नागरी मधील शिरपूर, शिंदखेडा, साक्री, दोंडाईचा 1 हजार 139 तर महानगरपालिका, धुळे क्षेत्रात 269 महिलांनी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी केली आहे. तसेच धुळे जिल्ह्य़ात 2 हजार 769 नागरिकांनी नारीशक्ती दूत ॲप (Nari Shakti Dut App) डाऊनलोड केले आहे.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी शहरांसोबतच ग्रामपातळीवरही महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमांची आखणी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. पात्र महिलेचे अर्ज भरण्यासाठी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका/अंगणवाडी सेविका, एनयूएलएम यांचे समूह संघटक (सीआरपी), मदत कक्ष प्रमुख, सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरुन घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.

तसेच नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका,अंगणवाडी सेविका, एनयूएलएम यांचे समूह संघटक (सीआरपी), मदत कक्ष प्रमुख, सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिला लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिध्द झाल्यावर, एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप/पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थीची नोंद झाल्यावर रु.५०/- याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.

राज्य शासनाने या योजनेची व्याप्ती वाढविल्यामुळे अंमलबजावणी अत्यंत सुलभ होणार असून अर्ज दाखल करणे सोपे होणार असल्याने अधिकाधिक लाभार्थी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news