

धुळे : धुळे शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील हायवे ट्रॅफीक पोलीस चौकीच्या मागे एका टायर व प्लास्टिकच्या भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग लागली.
भंगाराच्या गोडाऊनला लागलेल्या आगीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोदामाच्या परिसरातील गवताला लागलेली आग या शेड पर्यंत पोहोचली. त्यामुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान या आगीत लाखोचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे.
धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्ग लगत मोठ्या प्रमाणावर भंगाराचे गोदाम आहे. याच ठिकाणी प्लास्टिक भंगार आणि जुन्या टायरचे दुकान देखील आहे. मंगळवार (दि.8) रोजी आज दुपारच्या वेळी या दुकानातून अचानक धुराचे लोट निदर्शनास आले.
गोदामातील कामगारांनी त्यांच्याजवळ असलेल्या जार मधील पिण्याच्या पाण्याच्या मदतीने आगीवर नियंत्रण करण्याचे प्रयत्न केले. पण या गोडाऊन मध्ये भंगाराचे प्लास्टिकचे साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. आगीचे आणि धुराचे लोट लांबून दिसत होते. धुळे महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर कोरडे गवत आहे. या गवताला प्रथम आग लागून तीच आग गोदामा पर्यंत पोहोचली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होतो आहे.