

धुळे : जिल्ह्यातील गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत आणि नियमित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षात गॅस ग्राहकांना गॅस सिलेंडर वितरण संदर्भात तक्रार करता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी या नियंत्रण कक्षातील क्रमांकावर तक्रार असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संजय बागडे यांनी केले आहे.
आखाती देशांमध्ये युद्ध भडकल्यामुळे गॅसची टंचाई जाणवण्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या गॅस सिलेंडर वितरण करणाऱ्या एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी सिलेंडर मिळवण्यासाठी रांगा लावल्या. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने वारंवार पुरेसे सिलेंडर उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. जिल्ह्यात कुठेही गॅसची टंचाई होणार नाही ,अशी ग्वाही देखील जिल्हा प्रशासनाने दिली.
तर आमदार अनुप अग्रवाल यांनी ऑनलाइन बुकिंग मध्ये निर्माण होत असलेल्या अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचना केल्या. तसेच एजन्सी चालक आणि गॅस कंपनीचे सेल्स वितरक यांच्या बैठकीत देखील ग्राहकांना कोणताही त्रास होऊ नये, या संदर्भात सूचना दिल्या. या सर्व परिस्थितीचे अवलोकन करता आता जिल्हा प्रशासनाने गॅस वितरण सुरळीत ठेवणे आणि गॅस वितरणात कोणतीही तक्रार राहू नये, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. या नियंत्रण कक्षात पुरवठा निरीक्षक वैभव कुवर, यांची नियुक्ती करण्यात आली असून नियंत्रण कक्षासाठी ७२१८०६५१५५ या क्रमांकाच्या भ्रमणध्वनी क्रमांक देण्यात आला आहे.
धुळे जिल्हा कार्यक्षेत्रातील गॅस वितरणाबाबत तक्रारी असल्यास ग्राहकांना या क्रमांकावर संपर्क साधून मदत घेता येणार आहे. त्यामुळे गॅस वितरण संदर्भात काही तक्रार असल्यास या नियंत्रण कक्षातील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संजय बागडे यांनी केले आहे .