

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील भाडणे–नांदवन रोडवर एका दुचाकीस्वारावर बिबट्याने केलेल्या हल्ल्याची माहिती साक्री पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री. वळवी यांनी वन विभागाला दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी विनायक खैरनार (साक्री प्रा.) यांनी पिंपळनेर व साक्री प्रा. वनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या निर्देशानुसार तत्काळ घटनास्थळी पिंजरा, कॅमेरा ट्रॅप आदी साधनांची स्थापना करण्यात आली आहे. या घटनेत हर्षल शेवाळे हे दुचाकीस्वार जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
रस्ता ओलांडताना दुचाकी अचानक बिबट्यासमोर आल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे. नागरिकांनी रात्री एकट्याने बाहेर न पडण्याचे तसेच जनजागृती मोहिमेत दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात येत आहे.
उपवनसंरक्षक मो. बा. नाईकवाडी, सहायक वनसंरक्षक योगेश सातपुते आणि वनपरिक्षेत्र अधिकारी ओंकार ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल संदीप मंडलिक यांच्या नेतृत्वात रेस्क्यू टीम ड्रोन, कॅमेरा ट्रॅप आणि अन्य उपकरणांच्या साहाय्याने बिबट्याचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.