

धुळे : निकुंभे येथे बिबट्याच्या हल्ल्यात पारडू ठार झाल्याची घटना घडली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बिबट्याच्या मुक्त संचार होण्यामध्ये वाढ झाल्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकरी भीतीचे वातावरण आहे. मानवी वस्त्यांमध्येही बिबट्या फिरताना दिसत असल्याने वनविभागाने तातडीने कारवाई करून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी माजी आमदार कुणाल पाटील यांनी केली आहे.
निकुंभे येथील चुडामण अर्जून पाटील यांच्या घराजवळ बांधलेल्या म्हैस आणि पारडूवर बुधवार (दि.10) रोजी रात्री बिबट्याने हल्ला केला. यात पारडू ठार झाले. या घटनेनंतर परिसरातील भीती अधिक वाढली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यास भरपाई द्यावी, अशी सूचना पाटील यांनी वनविभागाला केली.
जंगलातील बिबट्या वारंवार शेतशिवारात येत असल्याने शेतकरी घाबरले आहेत. रब्बी हंगामात रात्री पाणी देण्यासाठी शेतात जाणे आवश्यक असते, पण बिबट्याच्या भीतीने शेतकरी शेतात जाणे टाळत आहेत. त्यामुळे वनविभागाने तातडीने सापळा लावून बिबट्याला पकडावे, गस्त वाढवावी आणि ग्रामस्थांमध्ये जागृती उपक्रम राबवावेत, अशी मागणी पाटील यांनी उपवनसंरक्षकांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.