Dhule Crime : औद्योगिक वसाहतीमधील कंपनीत छळ झाल्याचा व्हिडिओ बनवून तरुणाने तापी नदीत उडी मारून जीवन संपवले

Dhule Crime : औद्योगिक वसाहतीमधील कंपनीत छळ झाल्याचा व्हिडिओ बनवून तरुणाने तापी नदीत उडी मारून जीवन संपवले
file photo
Published on
Updated on

धुळे : धुळे जिल्ह्यातील तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर आज सापडला आहे. या तरुणाने नदीत उडी घेण्यापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित (व्हायरल) केला होता. कंपनीत होणाऱ्या छळाला कंटाळून आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्याने या व्हिडिओत म्हटले आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या मृत तरुणाच्या नातेवाईकांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या आंदोलन केले.

तापी नदीवरील गिधाडे येथील पुलावर एक मोटरसायकल आणि चप्पल आढळून आल्याने, येथून कुणीतरी नदीत उडी मारल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. या अनुषंगाने नदीपात्रात मृतदेहाचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. दरम्यान, या तालुक्यातून दोन दिवसांपूर्वी संदीप गिरासे हा युवक बेपत्ता झाला होता. त्याने दोन दिवसांपूर्वी याच पुलावरून एक व्हिडिओ प्रसारित केला होता. नरडाणा औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीमध्ये काही लोकांनी आपला छळ केला आणि आपल्यावर अन्याय केला, असा खळबळजनक आरोप त्याने या व्हिडिओमध्ये केला होता; तसेच औद्योगिक क्षेत्रात स्थानिक तरुणांना नाहक त्रास दिला जात असल्याचेही त्याने नमूद केले होते. यानंतर त्याने पुलावरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली.

दोन दिवसांनंतर आज त्याचा मृतदेह हाती लागला. यामुळे संदीपच्या संतप्त नातेवाईकांनी थेट शिरपूर शहर पोलीस ठाणे गाठून आवारात आंदोलन सुरू केले. मृत संदीपने आत्महत्या करण्यापूर्वी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये ज्यांची नावे घेतली आहेत, त्यांच्याविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली. यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलीस प्रशासनाने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण निवळले. या संदर्भात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news