

सोनगीर : आखाती देशामध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता शिरपूर शहरातही जाणवू लागला असून शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शिरपूर शहरात एकूण ६ पेट्रोल पंप असून त्यापैकी फक्त दोनच पेट्रोल पंपावर पेट्रोल शिल्लक असल्यामुळे नागरिकांच्या लांबचलांब रांगा लागल्याचे निदर्शनास आले आहे.
तालुका असलेल्या शिरपूर शहरात नागरिकांची मोठ्या संख्येत गर्दी असते. ६ पेट्रोल पंप पैकी फक्त दोनच पेट्रोल पंपावर पेट्रोल शिल्लक असल्यामुळे नागरिक त्रस्त झालेले असून पेट्रोल टंचाईची भीती निर्माण झाली आहे. वाहनधारकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत पेट्रोल पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी केली आहे. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून काही ठिकाणी पेट्रोल संपण्याच्या भीतीने नागरिकांकडून अतिरिक्त साठा करण्याचेही प्रयत्न होत असल्याचे दिसून आले.
दरम्यान शिरपूर तहसील प्रशासनाने नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केल आहे. तहसील अधिकाऱ्यांनी पेट्रोल पंप चालकांना कृत्रिम तुटवडा निर्माण करू नये तसेच नियमित पुरवठा सुरळीत ठेवावा अशा सूचना दिल्या आहेत. यासोबतच नागरिकांनीही अनावश्यक पेट्रोल साठा करू नये अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. लवकरच पेट्रोलचा पुरवठा सुरळीत होईल आणि परिस्थिती नियंत्रणात येईल असा विश्वास तहसील प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
परिस्थिती बाबत शिरपूर तहसील अधिकारी महेंद्र माळी माहिती देताना म्हणाले की, शिरपूर शहरामध्ये पेट्रोल पंपावर जो पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला आहे त्यामुळे सर्व पेट्रोल पंप धारकांनी कुठल्याही प्रकारचा साठा करून ठेवू नये आणि नागरिकांची फसवणूक होणार नाही याबाबत त्यांनी काळजी घ्यावी, आणि संबंधित पंपावरती जे सेल्स ऑफिसर आहेत त्यांच्याशी देखील आमचं बोलणं झालेले आहे आणि लवकरच शहरात पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत होणार आहे. मात्र सध्या तरी शिरपूर मधील पेट्रोल पंपावरील गर्दी आणि वाहनांच्या रांगा नागरिकांच्या चिंतेत भर टाकताना दिसत आहे.