

धुळे : शिरपूर तालुक्यातील जंगलात पैशाचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवून मध्य प्रदेशातील चौघांना बोलावणाऱ्या तिघा विरोधात आता जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यातील दोघेजण गोळीबारात जखमी झाले असून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. तिसरा आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.
शिरपूर तालुक्यातील जंगलात बोराडी येथे राहणारा गुलजारसिंग पारसिंग पावरा याने मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर आणि खंडवा येथील चौघांना संपर्क करून पैशाचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवले. त्यामुळे गणेश रामदास चौरे (रा. ब-हाणपुर), रतिलाल गणपत तायडे (रा. ब-हाणपुर) , अंकीत अनिल तिवारी (रा. खंडवा), विशाल करणसिंग कश्यप (रा.खंडवा) हे चौघेजण शिरपूर तालुक्यातील जंगलात पोहोचले. त्यांच्याकडून दीड लाख रुपये घेतल्यानंतर गुलजारसिंग यांनी पैशाचा पाऊस पाडण्याचे नाटक केले. मात्र त्यात त्याला यश आले नाही. त्यामुळे गणेश चौरे यांनी दीड लाख रुपये परत मागितले. मात्र गुलजारसिंग यांनी केवळ ५० हजार रुपये परत केले. त्यामुळे या दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली. हा वाद विकोपाला पोहोचल्यामुळे मध्य प्रदेशातील एकाने गोळीबार केला. यात गुलजार सिंग आणि त्याचा मित्र शिवा सिताराम पावरा हे दोघे जखमी झाले. तर त्यांचा एक सहकारी पसार होण्यात यशस्वी झाला. जखमी झालेल्या दोघांना धुळ्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले .दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मध्य प्रदेशात जाऊन चौघा आरोपींना बेड्या ठोकल्या .मात्र गुलजारसिंग पावरा ,शिवा पावरा आणि संतोष पावरा या तिघांनी अंधश्रद्धेला खतपाणी घालीत पैशाचा पाऊस पाडण्याचे नाटक केले. त्यामुळे त्यांच्या विरोधात देखील पोलीस प्रशासनाने फिर्याद दिल्याने महाराष्ट्र नरबळी आणि इतर अनिष्ट व अमानुष आणि अघोरी प्रथा व जादूटोणाविरोधी अधिनियम अधिनियम २०१३ चे कलम तीन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान पोलीस प्रशासनाने अंधश्रद्धेचे नाटक केल्याच्या घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या ठिकाणावरून त्यांना पूजेचे साहित्य आढळून आले आहे. त्यामुळे आता शिरपूर तालुक्यातील या भामट्यांनी आणखी कुणाला अशाप्रकारे गंडा घातला आहे किंवा काय, या दिशेने तपास सुरू झाला आहे.