धुळे : धुळे शहर विधानसभेच्या जागेवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेच्या ठाकरे गटाने माजी आमदार अनिल गोटे यांना उमेदवारी निश्चित केली आहे. या संदर्भातील माहिती दस्तूर खुद्द माजी आमदार गोटे यांनी दिली असून ते 24 ऑक्टोबर रोजी मातोश्रीवर हाती शिवबंधन बांधणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. (Maharashtra Assembly Election| Anil Gote)
धुळे शहर विधानसभेच्या जागेसाठी अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. या जागेसाठी महायुतीने भारतीय जनता पार्टी कडून अनुप अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर केली . मात्र महाविकास आघाडी कडून उमेदवार कोण आणि जागा नेमकी कोणत्या पक्षाला सुटेल, याबाबत कमालीची उत्सुकता होती. गेल्या आठवड्यात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचा धुळ्यात आढावा दौरा झाला. या दौऱ्या दरम्यान त्यांनी माजी आमदार अनिल गोटे यांच्या समवेत बंद दाराआड चर्चा केली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख हिलाल माळी यांच्या निष्ठेचे उदाहरण देत असतानाच राजकारणात निवडून येण्याचे मेरिट पाहिले जाईल ,असे सांगून एक प्रकारे गोटे यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्षपणे हिरवा कंदीलच दाखवला होता. मात्र या दोघाही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली. याबाबत कोणीही भाष्य केले नव्हते अखेर आज माजी आमदार अनिल गोटे यांनीच त्यांना महाविकास आघाडी कडून शिवसेनेने उमेदवारी देणे निश्चित केल्याची माहिती दिली. (Maharashtra Assembly Election| Anil Gote)
खासदार संजय राऊत यांनी संपर्क करून त्यांना २४ ऑक्टोबरला मातोश्रीवर येण्याचे निमंत्रण दिले आहे. यावेळी ते हाती शिवबंधन बांधणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. आपण यापूर्वी देखील महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे सदस्य आहोत. त्यामुळे आपण केवळ महाविकास आघाडीच्या दुसऱ्या घटक पक्षाकडून निवडणूक लढतो आहे. आपण महाविकास आघाडीचे घटक आजही असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.