Dhule Crime : धुळ्यात फिल्मी स्टाईलने व्यापाऱ्याची कार अडवून तब्बल ३ कोटी ६० लाखांची रोकड लांबवली

मुंबई-आग्रा महामार्गावर पळासनेरनजीक मध्यरात्री थरार
Major Robbery
धुळ्यात फिल्मी स्टाईलने व्यापाऱ्याची कार अडवून तब्बल ३ कोटी ६० लाखांची रोकड लांबवली
Published on: 
Updated on: 

धुळे : व्यापाऱ्याची कार अडवून त्याला मारहाण करून सुमारे तीन कोटी साठ लाख रुपयांची रोकड लांबवल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि.२) मुंबई-आग्रा महामार्गावर पळासनेरनजीक घडली. या प्रकरणात सहा अज्ञात दरोडेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि शिरपूर तालुका पोलिसांचे पथक या चोरट्यांच्या मागावर आहे.

सुरत येथील शिवरामभाई पटेल हे त्यांच्या मित्रासमवेत भोपाळ येथून मुंबई येथे (एम एच 04 एल एम 3179) या कारने रोकड पोहोचवण्यासाठी निघाले होते. त्यांची गाडी पळासनेर येथील पुलाजवळ आली असता मागून येणाऱ्या एका कारने त्यांना ओव्हरटेक केले. यानंतर गाडी अडवून त्यातून सहा ते सात दरोडेखोर खाली उतरले. हा सर्व प्रसंग घडत असताना पटेल यांना संशय आल्याने त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे दरोडेखोरांनी पाईपने मारून काच फोडली. यानंतर पटेल आणि त्यांच्या समवेत असणाऱ्या शैलेश भाई पटेल यांना कारमधून खेचून बाहेर काढले. या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांना दुसऱ्या कारमध्ये दाबून अज्ञात स्थळी घेऊन गेले .या दरम्यान त्यांच्याकडील तीन कोटी साठ लाखाची रोकड हिसकवून घेण्यात आली.

या प्रकारानंतर त्यांना अज्ञातस्थळी सोडून दरोडेखोरांनी पलायन केले. या घटनेनंतर पटेल यांनी थेट शिरपूर तालुका पोलीस ठाणे गाठून या घटनेची माहिती दिली. त्यानुसार अज्ञात दरोडेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या या दरोड्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे तसेच शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांनी स्वतंत्रपणे पथक तयार केले असून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.