

धुळे : पशु-पक्षी फार्माच्या दुकान स्थळ पाहणीचा अहवाल देण्यासाठी आठ हजाराची लाच स्वीकारल्या प्रकरणी धुळ्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक किशोर देशमुख यांच्यासह खाजगी पंटर तुषार जैन यांना धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
तक्रारदार यांनी मौजे शिरपुर येथील संकुलात भाडे तत्वावर गाळा घेतला असून त्यामध्ये त्यांना पशुपक्षी फार्माचे दुकान सुरु करायचे आहे. त्याचा परवाना मिळण्याकरीता त्यांनी दि.२५ फेब्रुवारी २०२५ रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धुळे विभागाकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज सादर केला होता. या अर्जाबाबत तक्रारदार व त्यांचा आतेभाऊ यांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालय, धुळे येथे जावून औषध निरीक्षक किशोर देशमुख यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी तक्रारदार यांना ते शिरपुर येथे मेडीकल दुकानदार तुषार जैन यांच्यासह दि. ४ मार्च २०२५ रोजी त्यांच्या दुकानावर येवून स्थळपरिक्षण करेल तेव्हा तुषार जैन यांच्याकडे ८ हजार रुपये द्यावे लागतील, त्याशिवाय मी पुढील कार्यवाही करणार नाही असे सांगितले. मात्र संबंधित तक्रारदाराने धुळे येथील प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात येऊन तक्रार दिली.
या तक्रारीची शिरपुर येथे जावुन पडताळणी केली असता शिरपुर येथे तक्रारदार यांनी भाडेतत्वावर घेतलेल्या दुकानावर औषध निरीक्षक किशोर देशमुख हे खाजगी इसम तुषार जैन यांच्यासह गेले असता औषध निरीक्षक किशोर देशमुख यांनी तक्रारदार यांच्या दुकानाचे स्थळ निरीक्षण केले. तेव्हा त्यांच्यासोबत आलेले खाजगी इसम तुषार जैन यांनी तक्रारदार यांच्याकडे ८ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यास औषध निरीक्षक देशमुख यांनी दुजोरा दिला होता.
त्याप्रमाणे आज धुळे येथील पारोळा चौफुली येथे सापळा लावला असता खाजगी इसम तुषार जैन यांनी त्यांच्या कारने येवुन पंचासमक्ष तकारदार यांच्याकडे लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम स्विकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच औषध निरीक्षक किशोर देशमुख यांना अन्न व औषध प्रशासन कार्यालय येथून ताब्यात घेण्यात आले असुन त्यांच्या विरुध्द आझादनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.