धुळे : आगामी गणेशोत्सव हा 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीत साजरा होत असून 16 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद हा सण साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ईद-ए-मिलादची मिरवणूक 19 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेऊन मुस्लिम बांधवांनी सामाजिक एकात्मता जोपासण्याचा संदेश दिला आहे.
ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक गुरुवार (दि.29) रोजी जिल्हा नियोजन सभागृह येथे झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, परिविक्षाधिन अधिकारी डी. सर्वानंद यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सण समारंभाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ईद-ए-मिलाद या दिवशी होणारी मिरवणूक एक किंवा दोन दिवसांनी काढण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्यावतीने सिरत कमिटी सदस्य तसेच बैठकीस उपस्थित मुस्लीम बांधवांना करण्यात आली. याबाबत उपस्थित मुस्लीम बांधवांनी प्रशासनाशी चर्चा करुन चर्चेअंती धुळे शहरातील ईद- ए- मिलादची मिरवणुक गुरुवार 19 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या निर्णयाचे तसेच ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूकीत डीजेचा वापर न करण्याच्या निर्णयाचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वागत करुन उपस्थित सिरत कमिटी सदस्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. तसेच येणारे सण, उत्सव शांततेने साजरे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी केले आहे.
जिल्हाधिकारी पापळकर यांनी आगामी सण उत्सवांच्या काळात रस्त्यावरील खड्डे, मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची स्वच्छता, पथदिवे तसेच शहरात स्वच्छता करावी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने सण उत्सवांच्या कालावधीत सुरळीत वीज पुरवठा करावा, संबंधित सबस्टेशन मधील कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पोलीस अधिक्षक धिवरे म्हणाले की, सोशल मीडियावर तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करु नयेत. मिरवणूकी दरम्यान स्वयंसेवक नेमावेत. मिरवणूक काळात धार्मिक स्थळी तसेच मिरवणूकीत आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांमधील वाढती व्यसनाधिता लक्षात घेत प्रत्येक ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर नवनवीन सामाजिक उपक्रम राबवावेत. यावर्षी व्यसनाधिता विरोधात सिरत कमिटीने वाढती व्यसनाधिताबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले.
महापालिका आयुक्त श्रीमती अमिता दगडे पाटील म्हणाल्या की, ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनामार्फत सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. मिरवणूक मार्गावरील खड्डे, साफसफाई, रस्यांवरील बंद पथदिवे बसविण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी जिल्ह्यातील सिरत कमिटीचे सदस्य, मुस्लिम धर्मगुरु, मौलाना, मुस्लिम समाजबांधव, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, शांतता कमिटीचे सदस्य यांना येणाऱ्या अडचणी तसेच काही मौलिक सुचना मांडल्या. बैठकीस पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.