

धुळे : देशाच्या पहिल्या आणि माजी महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची शिंदखेडा तालुक्यातील जमीन हडप करण्यासाठी राज्याचे मंत्री जयकुमार रावळ यांनी न्यायालयात दाखल केलेला दावा फेटाळला आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या वार्ता करणारी भाजपा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असा प्रकार करणारा मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात चालणार आहे काय, असा प्रश्न माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.
धुळे येथील कल्याण भवनात झालेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, तेजस गोटे, महानगर प्रमुख ललित माळी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी माजी आमदार अनिल गोटे यांनी शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा शिवारातील दहा हेक्टर 38 आर, गट नंबर 403/1, 403 आणि 404 या संदर्भातील सविस्तर माहिती दिली. ही जमीन केवळ नातेवाईक म्हणून मंत्री रावळ यांच्या नातेवाईकांकडे सोपवली. मात्र त्यांनी देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती असणाऱ्या प्रतिभाताई शेखावत (पाटील ) यांच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर पीक पाणी लावून कोट्यवधी रुपयाची जमीन हडप करण्याचे कुटील कारस्थान केल्याचा प्रकार समोर आला आहे.
यासाठी खोट्या तक्रारी करून निरपराध लोकांना छळण्यात आले. कोणत्याही मार्गाने ही जमीन मिळत नसल्याचे पाहून रावळ यांनी राष्ट्रपती पदावरून प्रतिभाताई पाटील या खाली उतरताच न्यायालयात दावा केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून धुळे न्यायालयात प्रतिभा पाटील यांनी न्यायाची प्रतीक्षा केली. जवळपास 89 वर्ष वय असणाऱ्या व देशासमोरील आदर्श असणाऱ्या प्रतिभाताईंना अक्षरशः हैराण करण्यात येत आहे. त्यांच्या वयाचा आणि पदाचा कुठलाही सन्मान व आदर न ठेवता त्यांची एक प्रकारे छळवणूकच केली गेली असल्याचे गोटे यांनी यावेळी म्हटले आहे.
जमीन हडप करण्यासाठी नोंदणी नसलेल्या ट्रस्टअंतर्गत दाखवली गेली आहे. यात जयकुमार रावळ यांच्याच परिवारातील सदस्यांचा समावेश केला गेला. प्रतिभाताई पाटील यांच्या परिवारातील एकाही माणसाला या ट्रस्टमध्ये घेतले गेले नाही. या सर्व बाबींचा उहापोह न्यायालयात केलेल्या दाव्याच्या संदर्भात झाला. तत्कालीन न्यायाधीश एफ एम ख्वाजा यांनी हा दावा फेटाळून लावत ही जमीन प्रतिभाताई पाटील यांना परत केली, अशी माहिती देखील गोटे यांनी यावेळी दिली आहे. विशेषतः दह्याने आणि बह्याने शिवारात पाण्याखाली असलेली जमीन बेकायदेशीरपणे मालकी दाखवून चार कोटी रुपये घेतले गेले. तत्कालीन पाटबंधारे मंत्री अजित पवार यांनी देखील सभागृहात या संदर्भात उत्तर दिले आहे. आता अशी सर्व प्रकरणे पाहता भारतीय जनता पार्टीने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणी देखील गोटे यांनी केली आहे. विशेषता देशाच्या पहिला महिला राष्ट्रपती असणाऱ्या प्रतिभा पाटील यांना छळणाऱ्या व्यक्तीला मंत्रिमंडळात स्थान दिले पाहिजे का, याचे उत्तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पार्टीने दिले पाहिजे, अशी टीका देखील गोटे यांनी यावेळी व्यक्त केली.