

धुळे : राज्य सरकारच्या जलसंपदा विभागामार्फत 15 ते 30 एप्रिल या कालावधीत आयोजित जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 चे उद्घाटन मंगळवार (दि.15) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात मोठ्या उत्साहात झाले. यावेळी आमदार राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अधिक्षक अभियंता संदीप सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
“महायुती सरकारने सत्तेत आल्यानंतर 100 दिवसांचा कृती आराखडा सादर केला. त्याचाच भाग म्हणून जल व्यवस्थापन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे,” असे आमदार राघवेंद्र पाटील म्हणाले.
सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेमुळे धुळे जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वाढणार असून, राज्यातील नार-पार प्रकल्पातून 2-3 टीएमसी पाणी जिल्ह्यासाठी मिळावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
“जल व्यवस्थापन पंधरवडा यशस्वी करण्यासाठी कृषी, वन, जलसंधारण, महसूल, ग्रामविकास आदी सर्व विभागांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे,” असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्पष्ट केले.
पाण्याच्या बचतीबाबत जनजागृती करण्यावर त्यांनी भर दिला आणि सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसारित करण्याचे आवाहन केले.
“पाणी हा विषय केवळ जलसंधारण विभागापुरता मर्यादित नसून, प्रत्येक नागरिकाने पाणी बचतीचा मंत्र अंगीकारावा,” असे सीईओ विशाल नरवाडे यांनी सांगितले.
महिलांना पाणीटंचाईमुळे जास्त त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे पाणी बचतीबाबत महिला गट तयार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
अधिक्षक अभियंता संदीप सोनवणे यांनी पंधरवड्याच्या उपक्रमांची माहिती दिली. या कालावधीत अधिकारी प्रशिक्षण, कार्यालय स्वच्छता, जल पुनर्भरण, शेतकरी संवाद, कालवा स्वच्छता अभियान, पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण, महिला मेळावे, कार्यशाळा, पाण्याच्या वापराचे परीक्षण आदी उपक्रम राबवले जाणार आहेत.
कार्यक्रमाप्रसंगी पाच प्रमुख नद्यांच्या (तापी, बुराई, अनेर, पांझरा, कान) जलकलश पूजनाने जलपुजन करण्यात आले. त्यानंतर जल बचतीच्या पोस्टरचे अनावरण, जलगीत सादरीकरण व उपस्थितांना जल बचतीची प्रतिज्ञा देण्यात आली. अभियंता वासुदेव पवार यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.