Dhule | बोरविहीर येथील टोलनाक्याचा अनागोंदी कारभाराविरोधात आंदोलनाचा इशारा

आमदार राम भदाणे यांचे ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Dhule News
आमदार राम भदाणे यांचे ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनPudhari
Published on
Updated on

धुळे | धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ चे बहुतांश काम अद्याप अपूर्ण असताना संबंधित ठेकेदाराकडून धुळे तालुक्यातील बोरविहीर येथे अवैध पद्धतीने टोलवसुली सुरू झाली आहे. याशिवाय संबंधित टोलनाका चालकाकडून परिसरातील विविध ग्रामस्थांसह वाहनधारक प्रवाशांशी अरेरावी केली जात आहे. याबाबत आपण त्वरित लक्ष घालावे, अन्यथा परिसरातील विविध गावांतील ग्रामस्थांसह वाहनधारकांच्या सहभागातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांनी दिला आहे.

यासंदर्भात आमदार भदाणे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी येथील जिल्हाधिकारी जितेंद्र पापलकर यांना टोलनाक्या संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन देत त्यांच्याशी चर्चा केली.

यावेळी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे महाप्रबंधक संजय यादव, भाजपचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भदाणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अरविंद जाधव, भाऊसाहेब देसले, भाजपचे ज्येष्ठ नेते विजय गजानन पाटील, किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बापू खलाणे, भाजपचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर पाटील, मोहन भदाणे, प्रभाकर पाटील, जितेंद्र बंब, बोरविहीरचे सरपंच किरण ठाकरे, जुनवण्याचे सरपंच रावसाहेब खैरनार, अनिल गवळी, भय्या सोनवणे टॅक्सी युनियनचे पदाधिकारी, परिसरातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार भदाणे यांनी टोलनाका संदर्भात जिल्हाधिकारी पापळकर यांना सविस्तर माहिती दिली. धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्याप प्रगतिपथावर आहे. महामार्गावर बहुतांश ठिकाणी रस्त्यासह साइडपट्ट्यांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. काही ठिकाणी पुलांची, उड्डाणपुलांसह सर्व्हिस रोडची कामेही अपूर्ण आहेत. तरीही संबंधित ठेकेदाराकडून धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बोरविहीर येथे टोलनाका सुरू करून वाहनधारकांकडून वसुली सुरू झाली आहे. याशिवाय त्यांच्या कार्यपद्धतीबाबतही टोलनाका परिसरातील विविध गावांतील ग्रामस्थांसह वाहनधारकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. संबंधित टोलनाकाचालक हा गुंड प्रवृत्तीचा असून प्रवाशी नागरिकांशी अतिशय उद्दामपणे वागत आहे. यामुळे परिसरातील ग्रामस्थांसह प्रवाशी नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आपण या प्रश्नी लक्ष घालावे. ठेकेदारासह राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून रस्त्याची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून घ्यावीत, टोलनाक्याजवळच्या गावांतील वारंवार ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना संपूर्ण टोलमाफी द्यावी, टोलनाक्याजवळील २० किलोमीटर अंतरातील गावांतील वाहनधारकांना कमीत कमी टोल आकारावा, वाहनधारकांशी सौजन्याने वागण्याच्या सूचना द्याव्यात, धुळे तालुक्यातील लोकप्रतिनिधी दिवसभर मतदारसंघातील कामांनिमित्त प्रवास करत असतात, त्यांनाही टोलमाफी मिळावी, आदी मागण्याही आमदार भदाणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केल्या.

जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यवाहीचे आश्वासन

आमदार भदाणे यांनी टोलनाकासंदर्भातील समस्यांबाबत आपल्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व टोलनाकाधारक यांच्याशी समन्वय साधून यापुढील काळात कुठल्याही अडचणी येणार नाहीत, याबाबत कार्यवाहीचे आदेश द्यावेत, अशी मागणीही जिल्हाधिकारी पापलकर यांच्याकडे केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत त्वरित कार्यवाहीच्या सूचना राष्ट्रीय महामार्गाचे प्रबंधक संजय यादव यांना दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news