

धुळे : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत धुळे जिल्ह्यात सोमवार ( दि. 23 डिसेंबर) पासून सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांनी दिली आहे.
राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत राज्यशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 23 डिसेंबर ते 3 जानेवारी, 2025 दरम्यान सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम राबविली जाणार आहे. शहरी व ग्रामीण भागात अतिजोखमीच्या ठिकाणी झोपडपट्टी, वृध्दाश्रम, वीट भट्टी, बांधकाम साईट, कारागृह, आश्रमशाळा, वसतीगृह इत्यादी ठिकाणी तयार केलेल्या कृती आराखडयानुसार आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, क्षेत्रिय स्तरावरील आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक यांचे पथकाद्वारे दररोज 40 ते 50 घरांना भेटी देणार आहेत. मोहिमेमध्ये प्रशिक्षित पथकाव्दारे गृहभेट देऊन क्षयरोगाची लक्षणे असणा-या व्यक्तींचा शोध घेण्यात येऊन संशयित क्षयरुग्णांचे थुंकी नमुने व एक्स-रे तपासणी सिबिनॅट तपासणी तसेच आवश्यकतेनुसार इतर तपासण्या करण्यात येणार आहेत. क्षयरोगाची लक्षण असणा-या व्यक्तीचे रोगनिदान व नवीन आढळलेल्या क्षयरुग्णांचा औषधोपचार सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये मोफत करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी आपल्या घरी सर्वेक्षणासाठी आलेल्या आरोग्य कर्मचा-यास व आशा कार्यकर्ती व स्वयंसेवक यांना नागरीकांनी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगांवकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांनी केले आहे.