Dhule | शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करा – पालकमंत्री जयकुमार रावल

Dhule News | खरीप हंगामासाठी 3.95 लाख हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट, 26,913 क्विंटल बियाणे व 1.452 लाख मेट्रिक टन खतांची मागणी
धुळे
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात खरीप हंगामपूर्व 2025 ची जिल्हास्तरीय आढावा बैठक पार पडली. Pudhari News Network
Published on
Updated on

धुळे : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध उपाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

Summary

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात खरीप हंगामपूर्व 2025 ची जिल्हास्तरीय आढावा बैठक पार पडली. यामध्ये खरीप हंगामाचे नियोजन, बियाणे व खत पुरवठा, प्रशिक्षण व जनजागृती, पीककर्ज व योजना लाभ व फलोत्पादन व यांत्रिकीकरण या विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच नवीन उपक्रमांचे उद्घाटन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार काशिराम पावरा, मंजुळा गावित, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आदी उपस्थित होते.

खरीप हंगामाचे नियोजन

जिल्हास्तरीय आढावा बैठकीत पालकमंत्री रावल म्हणाले की, गतवर्षी खरीपासाठी 4.36 लाख हेक्टरपैकी 3.84 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा खरीपासाठी 3.95 लाख हेक्टरचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रब्बी हंगामासाठी देखील पेरणी वाढविण्याचे निर्देश देत त्यांनी पाणी व्यवस्थापन, पीक विमा, बाजारपेठ व्यवस्था, आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यावर भर दिला.

5 भरारी पथके,16 गुणवत्ता निरीक्षक नियुक्त

जिल्ह्यासाठी 26,913 क्विंटल बियाण्यांची आणि 1.452 लाख मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी 1.072 लाख मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर झाले आहे. बोगस बियाणे व खत विक्री रोखण्यासाठी 5 भरारी पथके व 16 गुणवत्ता निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांना हवामान, किडरोग नियंत्रण, खत व बियाणे व्यवस्थापन याबाबत माहिती देण्यासाठी कृषी विभागाने चित्रफिती (व्हिडिओ) तयार करून ग्रामसभा, व्हॉट्सॲप व सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करावी, असेही रावल यांनी यावेळी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना 15 मेपर्यंत 100 टक्के पीककर्ज वितरीत करावे, असे निर्देश बँकांना देण्यात आले आहे. कर्ज वितरण, विद्युत जोडणी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास विभाग आढावा बैठकीत घेण्यात आला.

2025-26 मध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत 94 कांदाचाळ, 25 शेडनेट हाऊस, 13 शेततळे, 250 ट्रॅक्टर, 350 रोटाव्हेटर यांसह इतर कृषी अवजारांचे वितरण करण्यात येणार आहे.

नवीन उपक्रमांचे उद्घाटन

यावेळी पालकमंत्री रावल यांच्या हस्ते तक्रार निवारण कक्ष आणि कृषी विभागाच्या योजना व माहितीसाठी व्हॉट्सॲप QR कोडचे तसेच पी.एम. किसान योजनेच्या भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news