

धुळे : “पुढील शंभर वर्षांत लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांच्यासारखे नेतृत्व जन्माला येणे शक्य नाही,” असे वक्तव्य करत माजी आमदार अनिल गोटे यांनी केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. धुळे येथील कल्याण भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना गोटे म्हणाले, “दहा दिवस उलटूनही केंद्र सरकारकडून केवळ गडगडाट सुरू आहे. पाकिस्तानचे तुकडे करणे म्हणजे मतपेट्यांत हेराफेरी करणे नाही. लालबहादूर शास्त्रींनी लाहोरपर्यंत फौजा घुसवल्या, तर इंदिरा गांधींनी कोणतीही धमकी न देता बांगलादेश निर्माण केला. असे नेतृत्व पुन्हा होणे कठीण आहे.”
पत्रकार परिषदेत यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख ललित माळी, तेजस गोटे आदी उपस्थित होते.
गोटे म्हणाले, “पंतप्रधानांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांना ‘मुक्त हस्ते कारवाई करा’ असे सांगितल्याचे वृत्त आहे. पण हे फक्त ए.सी.मध्ये बसून श्रेय घेणारे सरकार आहे. लाचार माध्यमे आणि टीव्ही चॅनेल्स जनतेची फसवणूक करत आहेत. पहलगाम, पुलवामा, उटी या ठिकाणी हौतात्म्य पत्करणाऱ्या जवानांच्या दुःखावर केवळ मलमपट्टी केली जात आहे.”
गोटे यांनी गुजरात राज्यातील युद्ध हुतात्म्यांची माहिती मागितली. “गुजरातमधून चीन, पाकिस्तान, बांगलादेशविरुद्धच्या युद्धात हुतात्मा झालेले किती? किमान काही नावे तरी हुतात्मा चौकात कोरावीत,” असा खोचक सल्ला त्यांनी दिला.
“सरकार फक्त विरोधकांच्या मागे ईडी, सीबीआय लावत आहे. बलात्कारी, भ्रष्टाचारी, खुनी, दरोडेखोर यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी सरकारने कटाक्ष ठेवलेला आहे. हेच जर देशसेवा मानली जात असेल, तर ही इतिहासात नमूद होईल,” असा आरोप गोटे यांनी केला.
गोटे म्हणाले, “शास्त्रींच्या काळात भारतीय सैन्याने अमेरिकेच्या पॅटन रणगाड्यांचा धुव्वा उडवला. तेव्हा संरक्षण मंत्री महाराष्ट्राचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण होते. त्याचप्रमाणे इंदिराजींनी केवळ दहा दिवसांत बांगलादेश निर्माण केला. कधीही त्यांनी हिंदुत्वाचा गर्व केला नाही, तरीही त्या खऱ्या राष्ट्रनिष्ठ होत्या.”
“पुलवामाच्या हल्ल्यात ४० जवान हुतात्मा झाले, पण सहा वर्षांनंतरही ४०० किलो RDX कुठून आले याचा तपास नाही. इस्रायलने युगांडामधील अँटेबी विमानतळावरून आपल्या नागरिकांची सुटका केली, त्याच धडाडीची अपेक्षा भारतात नाही का? ढगांमुळे रडार बंद होतील असा हास्यास्पद युक्तिवाद कोणतेही जबाबदार नेतृत्व करणार नाही. सर्जिकल स्ट्राइक फक्त मनोहर पर्रीकरांसारख्या देशभक्त संरक्षण मंत्र्यामुळे शक्य झाले,” असे गोटे म्हणाले.