

Dhule Monkeypox Case
धुळे : धुळे शहरातील गरीब नवाज परिसरात राहणाऱ्या एका 44 वर्ष वयाच्या पुरुषाचे रक्ताचे नमुने तपासणी नंतर त्याला मंकी फॉक्स हा संसर्गजन्य आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या रुग्णाला वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींच्या रक्ताचे नमुने देखील घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, मंकी फॉक्स आजाराची लागण झालेला महाराष्ट्रातला हा पहिलाच रुग्ण असल्याचा दावा केला जातो आहे.
धुळे येथील गरीब नवाज नगरात राहणारा 44 वर्षीय हा व्यक्ती सौदी अरेबिया येथून 2 ऑक्टोबर रोजी भारतात आला होता. धुळ्यात लग्न समारंभासाठी तो आला असताना त्याला अचानक ताप आणि त्वचेला खाज येत असल्याचे निदर्शनास आले .त्यामुळे त्याला तातडीने वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्याच्या रक्ताच्या नमुन्यांची प्राथमिक तपासणी केली असता त्याला मंकी फॉक्स हा आजार असू शकतो, असा संशय वैद्यकीय पथकाला होता.
त्यामुळे त्याच्या रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. हा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला मंकी फॉक्स झाल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्याच्या अंगावर मोठ्या प्रमाणात पुरळ आलेले असून अन्य लक्षण देखील त्याला दिसून येत आहेत. त्यामुळे त्याला वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्याला क्लाएड वन हा अतिदुर्मिळ विषाणूची लागण झाली असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
अशा प्रकारच्या रुग्णांकडून संसर्गजन्य पद्धतीने इतरांना लागण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असल्याने आता या रुग्णाच्या नातेवाईकांची देखील तपासणी केली जाते आहे. सुदैवाने या रुग्णाची पत्नी तसेच मुलांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, या संदर्भात माहिती देताना वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सयाजी भामरे यांनी सांगितले की, या रुग्णावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. तसेच त्याची प्रकृती स्थिर असून वैद्यकीय उपचारांना तो प्रतिसाद देतो आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.