

धुळे : धुळे शहरात केवळ बकरी ईदपुरती मर्यादित न राहता, वर्षभर गोवंशांची अवैध कत्तल आणि गोमांस विक्री सुरू असते. शहरातील काही विशिष्ट भाग हे या कत्तलींचे हॉटस्पॉट बनले असून, कत्तलीनंतरची घाण नाल्यांमध्ये टाकली जाते. उघड्यावर होणाऱ्या मांस विक्रीमुळे शहरवासीय त्रस्त झाले असून, दुर्गंधी व आरोग्यबाबत धोका निर्माण झाला आहे.
प्राण्यांची कत्तल याबाबत कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी मागणी आमदार अनुप अग्रवाल यांनी नव्याने नियुक्त झालेल्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याकडे केली. त्यांनी जिल्हाधिकारी यांची औपचारिक भेट घेऊन पुष्पगुच्छ देत स्वागत केले आणि शहरातील गंभीर समस्यांचा सखोल आढावा दिला.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार, भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, प्रशांत मोराणकर, महापालिकेच्या प्रभारी आयुक्त करुणा डहाळे, स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, अतिक्रमण पथकप्रमुख प्रसाद जाधव, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
रेल्वे क्रॉसिंगसह अनेक भागांमध्ये उघड्यावर परवानगीशिवाय मांस विक्री सुरू आहे. अशा विक्रेत्यांवर महापालिकेच्या विशेष पथकाद्वारे कारवाई करावी, अशी मागणी अग्रवाल यांनी यावेळी केली.
महापालिकेच्या तसेच इतर शासकीय जागांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. गट क्र. 510 मध्ये अनधिकृत दर्गा उभारण्यात आला असून, त्याचे अतिक्रमण अद्याप हटविले गेलेले नाही. या ठिकाणी थीम पार्कचा प्रस्ताव असून, लँड जिहाद थांबवण्याची गरज अग्रवाल यांनी अधोरेखित केली. तसेच जिल्ह्यातील 17 शांतता समित्यांमध्ये तरुणांचा सहभाग वाढवण्याची गरज आहे, असे अग्रवाल म्हणाले.
काही विशिष्ट गट अनधिकृत औषध विक्रीत गुंतले असून, समाजाचे आरोग्य बिघडवले जात आहे. यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
धुळे ड्रायपोर्ट प्रकल्पास चालना देण्यात यावा, सुमारे 10,000 कोटींच्या मालाची निर्यात जिल्ह्यातून होते, त्यासाठी स्थानिक ड्रायपोर्टचा विकास आवश्यक आहे. जिल्हा उद्योग मित्र समितीच्या नियमित बैठकांचे आयोजन करण्यात आले असून उद्योग क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी याची मदत होणार आहे.
महापालिका निवडणुकीपूर्वी यंत्रणेने सतर्कता बाळगून बोगस मतदारांची यादी तयार करुन त्यांची नावे वगळण्यात यावे. प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांचा आवाज नियंत्रणात आणून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यावर कार्यवाही करावी. अशा आदी सूचना व मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.