Dhule | सोनगीर शाळेचा राज्यातील सर्वोच्च सन्मान; मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते गौरव
धुळे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील 92 शासकीय निवासी शाळांमधून अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठीची शासकीय निवासी शाळा, सोनगीर (ता.धुळे) राज्यात विशेष उत्कृष्ट कार्याबद्दल प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच, "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तरावरही प्रथम क्रमांक पटकावत शाळेने 11 लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे.
या कामगिरीबद्दल पुण्यातील यशदा येथे 31 मे 2025 रोजी झालेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक ध्रुवास राठोड, गृहपाल मनोज पाटील, नियंत्रक अधिकारी संजय सैंदाणे (सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, धुळे) यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, समाजकल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, तसेच नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी मंत्री संजय शिरसाठ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, "हा सन्मान सामाजिक समतेच्या दिशेने प्रेरणादायी आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा करून सर्वसमावेशक धोरणे व प्रभावी अंमलबजावणीसाठी दिशा ठरवली आहे." कार्यशाळेमध्ये विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक सूचना करण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे यांनी सांगितले.

