

धुळे : धुळे-सोलापूर महामार्गावरील बोरविहीरनजीकच्या टोल नाक्यावर माजी आमदार शरद पाटील आणि टोल कर्मचारी यांच्यात तीव्र बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला आहे. या वादात माजी आमदार पाटील यांनी कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत हे प्रकरण आता थेट पोलीस ठाण्यात पोहोचले आहे. या संदर्भात शरद पाटील यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या अन्य एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या कारवाईमुळे माजी आमदारांना पथकरामधून (टोल) सूट देण्याच्या शासन निर्णयाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुंबई येथून समृद्धी महामार्गाने बोरविहीरमार्गे माजी आमदार शरद पाटील हे त्यांच्या एका सहकाऱ्यासोबत धुळे शहराकडे येत होते. त्यांची गाडी बोरविहीर टोल नाक्यावर आली असता, गाडीचा 'फास्टॅग' (Fastag) स्कॅन होत नसल्याने बॅरियर उघडत नव्हते. टोल कर्मचाऱ्याने फास्टॅगमध्ये पैसे नसल्याचे सांगितल्यावरून माजी आमदार शरद पाटील यांनी आपली ओळख सांगितली. मात्र, येथूनच वादाला सुरुवात झाली. टोल नाक्यावरील एका हिंदी भाषिक व्यक्तीने, "हा टोल आम्ही चालवतो," असे सांगत पाटील यांच्या माजी आमदार असल्याच्या ओळखपत्राच्या वैधतेवरच संशय घेतला. त्यामुळे वाद आणखीच चिघळला. संतप्त झालेल्या माजी आमदार पाटील यांनी कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावताना असभ्य शब्दांचा वापर केल्याचा आरोप टोल प्रशासनाने केला आहे.
या प्रकरणी टोल व्यवस्थापक पुष्पेंद्रसिंह नैनसिंह यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे पोलीस ठाण्यात माजी आमदार शरद पाटील आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २९६ (अ), ३५१ (२) (३), ३५२ आणि ३ (५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ११२ च्या उल्लंघन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने माजी आमदारांना पथकर वसुलीमधून सूट दिल्याचा आदेश असल्याचा दावा माजी आमदार पाटील यांनी केला. मात्र, टोल कर्मचाऱ्यांनी या आदेशाबाबत संशय निर्माण करत, माजी आमदारांना अशी कोणतीही सूट देता येणार नाही असा पवित्रा घेतला; तसेच तसा उलट आदेश आपल्याकडे असल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला. दुसरीकडे, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या शासन निर्णयाचा आधार घेत माजी आमदारांना टोलमधून सूट असल्याचा दावा पाटील समर्थकांकडून केला जात आहे.
टोल व्यवस्थापनाने माजी आमदारांबाबत असा ताठर निर्णय का घेतला, यावर आता धुळे शहरात खमंग चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, माजी आमदार शरद पाटील यांनी देखील हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे या संपूर्ण वादाला आता राजकीय कंगोरा लाभल्याची चर्चा धुळ्यात रंगली आहे.