

Anil Gote on illegal land occupation
धुळे : धुळ्यात भंगार बाजार नजीक छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा चबुतरावर उभारला जातो आहे. मात्र हा चबुतरा चुकीच्या पद्धतीने उभारला जात असून भविष्यात चबुतऱ्याचा गैरवापर होणार असल्याने आपण आक्षेप घेतला. आपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध नसून या चबुतऱ्याला विरोध आहे. त्यामुळेच न्यायालयात दावा दाखल केला आहे. मात्र संबंधितांनी पुतळ्याच्या नावाखाली शहरात अफवा पसरवणे सुरू केल्याने या दाव्यासाठी कोणीही वकील काम करण्यास तयार नाही. त्यामुळे अकरा जून रोजी आपण स्वतः न्यायालयात बाजू मांडणार असल्याची माहिती आज माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
धुळे येथील कल्याण भवनात आज ही पत्रकार परिषद झाली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी माजी आमदार अनिल गोटे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने रस्त्याला अडथळा ठरेल अशा पद्धतीने चबुतरा उभारून अतिक्रमण करण्यात येत असल्याचे पहिले पत्र काढले. चबुतरा आणि पुतळा हे दोन स्वतंत्र विषय आहेत .चबुतऱ्याच्या बांधकामामुळे भविष्यात समस्या निर्माण होईल ,म्हणूनच ही बाब आपण मांडली.
पुतळ्यांच्या बांधकामा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे घालून दिली. या आदेशाचे उल्लंघन करू नये, अन्यथा काम बंद करण्याचे देखील आदेशात नमूद केले. मात्र धुळ्यामध्ये सुरू असलेल्या या चबुतऱ्याच्या कामा संदर्भात कोणत्याही नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे न्यायालयात दावा दाखल केला. मात्र आता मनपाच्या आयुक्त या न्यायालयाची तत्त्व पाळण्याऐवजी खोटे आरोप करीत आहेत. आपला पुतळ्याला विरोध असल्याची खोटी माहिती न्यायालयात दिली गेली. पण आपण 32 वर्षांपूर्वी राज्यात कुठेही नसेल असे देखणे शिवस्मारक धुळ्यात उभे केले. असे असताना आरोप करणारे पोटभरू डांगर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवणार का ,असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
धुळ्यात महानगरपालिकेच्या आवारात संत नरहरी महाराज यांचे स्मारक उभारले गेले. पण या पुतळ्याच्या खाली चबुतऱ्याचा आधार घेऊन तयार केलेल्या खोलीत चुकीचे प्रकार चालतात. आता तर धुळ्यात भंगार बाजारा नजीक उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याखाली सुमारे 1500 स्क्वेअर फुट जागा तयार होते आहे. ही जागा हडप करून या चबुतऱ्याच्या नावाखाली चुकीचे काम आपण होऊ देणार नाही, असा इशारा देखील यावेळी गोटे यांनी दिला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करून शहरात अफवा पसरवण्याचे काम आदिवासी विद्यार्थ्यांची सुकडी खाणारे राजकीय नेते करीत आहेत. त्यामुळे आपला दावा चालवण्यासाठी एकही वकील तयार होत नाही. म्हणून येत्या 11 जून रोजी आपणच चबुतऱ्याला विरोध करणारी बाजू मांडणार असल्याचे गोटे यांनी सांगितले. या चबुतऱ्याच्या कामा संदर्भात कोणतेही नियमांचे पालन केले जात नाही. तसेच प्लॅन मध्ये सर्वे नंबर ,जमीन मालक व बांधकामा संदर्भातील माहिती नाही. अभियंत्याची स्वाक्षरी आहे. मात्र शिक्का व नोंदणी क्रमांक नाही, यावरून महानगरपालिकेने असा प्रकार एखाद्या खाजगी मालकाने बांधकामाची परवानगी करताना केल्यास तुम्ही त्याला परवानगी देणार का, असा प्रश्न देखील गोटे यांनी उपस्थित केला.
शासनाने काढलेल्या आदेशामध्ये एका महापुरुषाचा दुसरा पुतळा उभारण्यासाठी दोन किलोमीटरची मर्यादा ठरवून दिली आहे. मात्र त्याचाही भंग केला जात असल्याचा आरोप यावेळी गोटे यांनी केला. आपण धुळ्यात छत्रपती अग्रसेन महाराजांसह अनेक पुतळे उभे केले. त्यामुळे बेगडी आणि नकली हिंदुत्ववाद्यांनी मला हिंदुत्व शिकवू नये .हिंदुत्व आमच्या रक्तात आहे. त्यामुळे तुमचा डीएनए तुम्ही तपासून घ्या .तुमच्या मनातच पुतळ्यांसंदर्भात घाणेरडे विचार आहेत ,असा टोला देखील त्यांनी लगावला.