

धुळे: शहरातील मच्छीबाजारातील म्युनिसिपल कॉलनीतील (रामदेवबाबा नगर) 36 खोल्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या सफाई कामगारांना त्यांच्याकडून महापालिकेने वसूल केलेल्या घरभाडे फरकाची तब्बल 11 वर्षांची रक्कम लवकरच मिळणार आहे. महापालिकेने नुकताच तसा ठराव केला असून, या 36 सफाई कामगारांना प्रत्येकी अडीच ते तीन लाखांची रक्कम मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर, शहराचे आमदार अनुप अग्रवाल आणि भाजपच्या कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय पवार यांनी याबाबत महापालिकेकडे सतत पाठपुरावा केला.येथील महापालिकेने 21 जून 2013 रोजी मनपा मालकीची एकूण 114 घरे सफाई कामगारांच्या नावे करण्याचा ठराव मंजूर केला होता. तथापि, नगररचना विभागाकडील अहवालानुसार रामदेवबाबानगरमधील जागा वक्फ मंडळाची असल्याने यातील 36 खोल्यांचे खरेदीखत करण्यात कामगारांना अडचणी येत होत्या.
त्यामुळे संबंधित 36 कामगारांकडून 2014 पासून घरभाड्यापोटी वेतनातून रक्कम कपात केली जात होती. या कामगारांना त्यांच्या वेतनात घरभाडे भत्ताही देण्यात येत नसल्याने आमदार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पवार यांनी वेळोवेळी निवेदने देऊन रामदेवबाबा नगरमधील 36 खोल्यांमध्ये 25 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या सफाई कामगारांना ते राहत असलेली घरे नावावर करण्याची विनंती मनपाकडे केली होती. त्यानुसार 22 जुलै 2025 ला अटी-शर्तींच्या अधीन राहून ही घरे संबंधित कामगारांच्या नावे करण्यास मंजुरी मिळाली. यानंतर कामगारांना त्यांच्या वेतनात घरभाडे भत्ता लागू करावा, अशी मागणी पवार यांनी आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांच्याकडे केली. आमदार अग्रवाल यांनीही आयुक्तांना तशा सूचना दिल्या होत्या.
आमदार अग्रवाल यांच्या सूचनेनुसार महापालिकेने संबंधित 36 सफाई कामगारांना अटी व शर्तींस अधीन राहून जुलै 2025 पासून सुधारित नियमानुसार घरभाडे भत्ता लागू करण्यास मंजुरी दिली. मात्र, 2014 ते 2025 पर्यंत महापालिकेने वेतनातून कपात केलेल्या घरभाड्यापोटी रकमेचा फरक दिला नव्हता. याबाबत गेल्या 29 ऑक्टोबरला महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष डागोर यांनी आयुक्तांसह अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात कामगारांसंबंधी विविध विषयांवर चर्चा करत आढावा घेतला. तसेच सफाई कामगारांच्या वेतनातून कपात झालेल्या घरभाडे रकमेच्या फरकाची रक्कम त्वरित अदा करण्याचा आदेश दिला. त्यानुसार महापालिकेने संबंधित 36 कर्मचाऱ्यांना 2014 ते 2025 पर्यंत वसूल केलेल्या घरभाड्याच्या फरकाची रक्कम देण्याचा ठराव मंजूर केला आहे. लवकरच कामगारांना फरकाची रक्कम मिळणार आहे.
सफाई कामगारांनी मानले आभार
या 36 सफाई कामगारांना घरभाडे फरकापोटी प्रत्येकी तब्बल अडीच ते तीन लाखांपर्यंतची रक्कम मिळणार आहे. या प्रश्नी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार अनुप अग्रवाल, आयोगाचे अध्यक्ष डागोर, कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पवार यांचे सफाई कामगारांनी आभार मानले आहेत.