

धुळे : तालुक्यातील १५० महसुली गावांमध्ये सिटी सर्व्हे लागू करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. लोक पाणीपट्टी आणि घरपट्टी भरतात, पण त्यांच्याकडे अधिकृत 'सीटीएस' नंबर किंवा घराचा उतारा (७/१२ प्रमाणे) नसल्याने बँकेत कर्ज मिळवताना अडचणी येत होत्या. या अडचणी सोडविण्यासाठी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रामीणमधील ७७ गावे व मनपा हद्दीतील १३ गावांचा पुन्हा सर्व्हे करून त्यांना 'सीटीएस' नंबर देण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आमदार राम भदाणे यांनी दिली आहे.
मुंबईत महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात त्यांच्या आदेशानुसार विशेष बैठक झाली. या बैठकीस आमदार राम भदाणे, भाजपा जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते. आमदार राम भदाणे यांनी सांगितले, १९८० मध्ये ७७ गावांचा सिटी सर्व्हे झाला होता, पण त्यानंतर गावांचा विस्तार झाला, तरी नवीन सर्व्हे झाला नाही. तर हीच अवस्था धुळे मनपा हद्दीत समाविष्ट झालेल्या तेरा गावांची आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी लवकरात लवकर एकूण ऐंशी गावांचा पुन्हा सर्व्हे करून त्यांना 'सीटीटीएस' नंबर देण्यात येण्याचे आदेश दिलेत. या गावांचा पुढील १५ दिवसांत सर्व्हे करण्याचे निर्देश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत.
या बैठकीमुळे धुळे तालुक्यातील नागरिकांच्या मालमत्तेचा हक्क आणि त्यावरील कर्जाच्या सुविधांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. प्राॅपर्टी कार्ड मिळणार आहे. सरकारचे मनापासून आभार मानतो.असे आ. राम भदाणे, यांनी सांगितले.
सिटीसर्व्हेपासून वंचित गावांमधे बोरीस, लामकानी, बुरझड, शिरदाने, मेहरगाव, चिंचवड, निकुंभे, ढंडाणे, वडेल, तिसगाव, बोरकुंड, शिरूर, निमगुळ, विंचुर, जुनवणे, वेल्हाणे, मोघण, पुरमेपाडा, हेंद्रुण, आर्वी, धामणगाव, गोंदूर, वार, निमडाळे, चितोड, जळगाव, बिलाडी, मोराणे, अवधान, रानमळा, सावळदे, हेंकळवाडी, उडाणे, गाडउतार, नगाव, नंदाणे, दापुरे, दापुरी, कापडणे, तामसवाडी, सोनगीर, खेडे, चौगाव, नेर, कुसुंबा, गोताणे, चौगाव, देऊर, नांद्रे, फागणे, मुकटी, अजंग, सौंदाणे, चिंचखेडे, वरखेडे, वडजाई, मोहाडी प्र.डांगरी, बाळापुर, काळखेडे, महिंदळे, देवपूर, वलवाडी, मोहाडी प्र. लळींग आदी गावांचा समावेश आहे.